Share Market : शेअर बाजार कोसळला, निफ्टी, सेन्सेक्स धडाम, 15 मिनिटात गुंतवणूकदारांचे 2.52 लाख कोटी स्वाहा
Nifty, Sensex Crash : भारतीय शेअर बाजाराला आज कापरे भरले. शेअर बाजार कोसळला. सुरुवातीच्या सत्रातच बाजाराने मान टाकली. बीएसई सेन्सेक्स 764.88 अंक घसरला. तर निफ्टी 222.20 अंकांनी खाली आला.

घरगुती शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीने झाली आहे. सेन्सेक्समध्ये सुरुवातीच्या व्यापारी सत्रात 800 अंकापेक्षा अधिक घसरण झाली. तर निफ्टी 24,600 अंकाहून खाली आला. आता 11.50 वाजता बीएसई 826.07 अंक घसरणीसह 80,769.59 अंकावर व्यापार करत आहे. तर निफ्टी 239.80 अंकांनी घसरून 24,574.05 व्यापार करत आहे. बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे 15 मिनिटांत 2.52 लाख कोटींचे नुकसान झाले.
या शेअरमध्ये मोठी घसरण
सेन्सेक्समध्ये सहभागी 30 कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, नेस्ले, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेज आणि महिंद्रा आणि महिंद्राचे शेअर सर्वाधिक घसरले. अदानी पोर्टस आणि इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्स बुधवारी 410.19 अंकांनी वधारला. तो 81,596.63 अंकावर बंद झाला होता. तर निफ्टी 129.55 अंकांनी वधारून 24,813.45 अंकावर बंद झाला होता. तर आज सुरुवातीच्या सत्रातच बाजाराने मान टाकली. बीएसई सेन्सेक्स 764.88 अंक घसरला. तर निफ्टी 222.20 अंकांनी खाली आला.




का घसरले शेअर
शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. बुधवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. US बाँड यील्डमध्ये तेजी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कर कपातीचे बिल आणल्याने अमेरिकन बाजारात चिंता दिसून आली. अमेरिकेत 20 वर्षात US बाँड यील्डमध्ये मोठी तेजी दिसून आली. मुडीजने गेल्या शुक्रवारी अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग घसरवले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला. तर त्याचा परिणाम भारतीय बाजारावर पण दिसून आला. त्यामुळे बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये कमकुवतपणा दिसला. त्यामुळे बाजारात घसरण झाली.
सेन्सेक्स 1 लाखांचा टप्पा गाठणार
मॉर्गन स्टेनलीनुसार, सप्टेंबर 2024 मधील उच्चांकानंतर शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा मोठी संधी असल्याचे ही संस्था सांगते. ब्रोकरेज फर्मने जून 2026 साठी सेन्सेक्सचे लक्ष्य वाढवले आहे. मॉर्गन स्टेनलीने जून 2026 पर्यंत सेन्सेक्स 89,000 अंकापर्यंत झेपावेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या यामध्ये 8 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तर मॉर्गन स्टेनलीच्या अंदाजानुसार, जून 2026 च्या सुरुवातीला सेन्सेक्स 1 लाखांचा टप्पा गाठू शकतो.