
तुमच्या खात्यात 6000 कोटी रुपये जमा आहेत तर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये टेबल स्वच्छ करण्याचे, भांडी घासण्याचे काम केले असते का? अथवा घरोघरी जाऊन सामान विक्री केली असती का? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का, इतक्या रुपयात तर काहींनी ऐषआराम केला असता. पण हे उदाहरण अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. सुरतचे डायमंड किंग, मोठे व्यापारी सावजी ढोलकीय हे दरवर्षी त्यांच्या कर्मचाऱ्यांना महागडे गिफ्ट देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण त्यांच्या मुलाने कधी सेल्समन म्हणून तर कधी हॉटेलवर वेटर म्हणून काम केले आहे. त्यामागील कारण ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
कर्मचाऱ्यांना दिवाळीत कधी कार तर कधी फ्लॅट गिफ्ट देणारे सावजी ढोलकिया हे सुरतमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यापारी आहेत. हिरे व्यापारी सावजी ढोलकिया हे धनजी हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांची संपत्ती 12000 कोटींपेक्षा अधिक आहे. पण त्यांनी मुलाला सर्वसामान्यांचे जीणे कसे असते आणि संघर्ष कसा मनुष्याला घडवतो याचा अनुभव घेण्यासाठी सेल्समन आणि वेटरचे काम करण्यास सांगितले. आश्चर्य म्हणजे मुलाने सुद्धा कुठलीही कुरकुर न करता ही कामं मन लावून केली.
4 थी पास ढोलकियांचे साम्राज्य
1962 मध्ये गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील दुधला गावात एका शेतकरी कुटुंबात सावजी ढोलकिया यांचा जन्म झाला. परिस्थितीमुळे त्यांना इयत्ता चौथीपर्यंतच शिक्षण घेता आलं. सुरत आणि इतर शहरात त्यांनी अनेक कामं केली. 1992 साली त्यांनी तीन भावांसह हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरूवात केली. आज त्यांच्या कंपनीत 6500 हून अधिक कर्मचारी आहेत. ते दरवर्षी दिवाळीत या कर्मचाऱ्यांना एकदम हटके गिफ्ट देतात. KISNA ज्वैलर्सचे मालक सावजी ढोलकिया यांनी त्यांच्या चारही मुलांना सर्वसामान्यांसारखं जीवन जगण्याचा मौलिक सल्ला दिला. सर्वांनी त्यांच्या वडिलांची ही इच्छा पूर्ण केली.
कष्टाचे मूल्य समजवण्यासाठी युक्ती
सावजी ढोलकिया यांनी त्यांच्या कुटुंबात एक वेगळीच परंपरा सुरू केली. मुलांना पैशांचे आणि कष्टाचे मूल्य समजवण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी मुलांना अव्वल दर्जाचे शिक्षण दिले. पण जीवनाच्या पाठशाळेचे धडे गिरवण्यासाठी त्यांना सर्वसामान्य जीवन जगण्याचा आग्रह केला. मुलांनी अगदी आनंदाने ही अट मान्य केली. कारण वडील हालाकीच्या परिस्थितीतून श्रीमंत झाले होते. त्यांचा एक मुलगा द्रव्य ढोलकियाने तर वेटर आणि सेल्समन म्हणून नोकरी केली. लंडन येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर द्रव्य भारतात परतला. तेव्हा सावजी यांनी मुलाला हॉटेलमध्ये नोकर होण्याची अट घातली.
द्रव्य ढोलकियाने कधी बुटाच्या दुकानात तर कधी मॅकडोनल्डसच्या आऊटलेटमध्ये काम केले. सावजी ढोलकिया यांनी मुलाला कोणतीही नोकरी चार महिन्यांच्यावर न करण्याचा सल्ला दिला होता. कोट्यवधींचा मालक, खात्यात कोट्यवधींची रक्कम पण द्रव्य ढोलकियाला जगण्यासाठी पैसा कमवावा लागत होता. लोकांकडे काम मागायला जावे लागत होते. त्याने या काळात अनेक ठिकाणी नकार पचवला. काही ठिकाणी पडेल ते काम केले. जगण्याचा संघर्ष जाणून घेतला. 180 रुपये रोजंदारीवर त्याने काम केले. कधी कधी तर काम न मिळाल्याने त्याला हॉटेल मालकाकडे जेवणासाठी हात जोडावे लागले. कुणाकडे उधार पैसे मागावे लागले. 40 रुपये जेवणाच्या थाळीसाठी त्याच्याकडे भ्रांत होती. या अनुभवातून तावून सलाखून निघालेला द्रव्य आज वडिलांच्या व्यवसायात मदत करत आहे.