किरकोळ गुंतवणूकदार हेच शेअर मार्केटचा कणा, टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी, सीईओ बरुण दास यांचे प्रतिपादन!

मनी 9 तर्फे आयोजित केलेल्या फायनॅन्शियल फ्रिडम समिट 2026 मध्ये बरुण दास यांनी स्वागतपर भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी गुंतवणूक, बचत अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले.

किरकोळ गुंतवणूकदार हेच शेअर मार्केटचा कणा, टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी, सीईओ बरुण दास यांचे प्रतिपादन!
barun das
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 12, 2026 | 8:43 PM

Money9 Financial Freedom Summit 2026 : मनी 9 तर्फे आयोजित केली जाणारी फायनॅन्शियल फ्रिडम समिट 2026 ला सुरुवात झाली आहे. या समिटमध्ये टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी स्वागतपर भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी एसआयपी, सोने, किरकोळ गुंतवणूक यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक यावरही त्यांचे मत व्यक्त केले. भारतात आजही सोने ही विश्वासार्ह गुंतवणूक आहे, असे ते म्हणाले.

भारतातील कुटुंबांकडे साधारण 27000 टन सोनं

आपल्या भाषणात बोलताना बरुण दास म्हणाले की, “मला कधीकधी वाटतं की आपल्या आजीचे विचार योग्य होते. सोनं खरंच विश्वासार्ह गुंतवणूक आहे. गेल्या दीड वर्षांत सोन्याचा भाव दुप्पट झाला आहे. लोकांनी शेअर बाजारातून जेवढे पैसे कमवले आहेत, तेवढेच पैसे काही लोकांनी आपल्या पूर्वजांच्या संपत्तीतून कमवले आहेत. भारतातील कुटुंबांकडे साधारण 27000 टन सोनं आहे. या सोन्यामुळे भारतीय कुटुंबांच्या संपत्तीत 100 लाख कोटी रुपये जमा झालेले आहेत. सोनं हीच भारतीय कुटुंबाची खरी ताकद आहे. जगात सर्वाधिक सोन्याचा मालकी हक्क भारताकडेच आहे,” असे बरुण दास यावेळी म्हणाले.

किरकोळ गुंतवणूकदारच खरे हिरो

बरुण दास यांनी शेअर बाजारावरही भाष्य केले. “गेल्या दोन वर्षात शेअर बाजारातील खरे हिरो हे संस्थात्मक गुंतवणूकदार नाहीत. खरे हिरो तर किरकोळ गुंतवणूकदार आहेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच मनी 9 च्या चौथ्या फायनॅन्शियल फ्रिडम समिटमध्ये मी तुमचे स्वागत करतो. आम्ही टीव्ही 9 नेटवर्कतर्फे मनी 9 लॉन्च करताना एक खास मिशन डोळ्यासमोर ठेवले होते. भारतीय भाषांमध्ये लोकांना आर्थिक साक्षर करता यावे, लोक आर्थिक सक्षम व्हावीत असा यामागचा उद्देश आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. आपण प्रत्येकजण पैशांसाठीच काम करतो. परंतु जेव्हा पैसा आपल्यासाठी काम करतो तेव्हा आपण आर्थिक दृष्टीकोनातून स्वतंत्र होतो, असेही बरुण दास म्हणाले. 2024 आणि 2025 या वर्षांमध्ये परदेशी गुंतवणूकदार विक्रेते राहिलेले आहेत. या काळात भारतीय स्टॉक मार्केटला किरकोळ गुंतवणूकदारांनीच साथ दिली, असेही त्यांनी सांगितले.

एसआयपीवर बोलताना बरुण दास म्हणाले की…

एसआयपीवर बोलताना बरुण दास म्हणाले की, अलिकडच्या आकडेवारीवर अभ्यास करायचा असेल तर डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 मध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांनी 31 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. जानेवारी महिन्यापर्यंत देशात 21 कोटींपेक्षा जास्त एसआयपी खाते सक्रीय आहेत.

Follow Us