
छोट्या-छोट्या कारणावरून आपल्या जीवाचं बरवाईट करून घेण्याच्य घटना आजकाल खूप वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत एका अल्पवयीन मुलाने बहुमजली इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं, आणि त्याचं कारण काय तर आईने त्याला ट्यूशनला जायला सांगितलं. छोट्याशा कारणावरून एवढं टोकाचं पाऊल उचलण्याच्या या हादरवणाऱ्या घटना बऱ्याच वाढल्या असून आता नाशिकमध्येही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘मला डान्स क्लास का लावला नाही?’ असा प्रश्न उपस्थित अवघ्या 19 वर्षांच्या तरूणीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा खळबळजनक प्रकार नाशिकच्या मखमलाबाद परिसरात घ़डला आहे.
याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिकचा तपास केला जातोय. या घटनेमुळे कौटुंबिक नाजूकतेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून, फक्त करिअर नव्हे तर मुलांच्या कलागुणांनाही समजून घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
डान्स क्लास लावला नाही म्हणून रागावली अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, सेजल हरिष यादव असं मृत तरूणीचं नाव असून ती फक्त 19 वर्षांची होती. ती नाशिकमधील गामणे मळा येथील सोहम अपार्टमेंटमध्ये रहात होती. सेजल हिला नृत्याची प्रचंड आवड होती, मात्र असं असतानाही पालकांनी डान्सकडे दुर्लक्ष केल्याचा तीव्र राग तिच्या मनात होता. आणि याच रागातून तिने साधारण 3 महिन्यांपूर्वी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. 27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता तणावात असलेल्या सेजलने घरातील टॉयलेट क्लिनर म्हणजेच हार्पिक प्यायले. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आण तिची प्रकृती बिघडली हे लक्षात आल्यावर कुटुंबीयहादरले, पण त्यांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं. नंतर, दुसऱ्या दिवशी सेजलला मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तब्बल 16 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर 12 मे 2025 रोजी सेजलने अखेरचा श्वास घेतला.
तिच्या या भयानक कृतीमुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून तिच्या काकूनेही शोक व्यक्त केला आहे. आमची सेजल खूप हुशार होती. फक्त अभ्यास नव्हे तर डान्स उत्तम करायची, हसायची, सगळ्यांना हसवायची, खूप स्मार्ट होती, कॉमेडी करायची, चित्र छान काढायची. पण तिने असं अचानक का केलं, एवढं टोकाचं पाऊल का उचललं समजू शकलंच नाही, असं म्हणततिच्या आठवणी जागवणाऱ्या काकूच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू तरळले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिकचा तपास केला जातोय. या घटनेमुळे कौटुंबिक नाजूकतेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून, फक्त करिअर नव्हे तर मुलांच्या कलागुणांनाही समजून घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. ही आत्महत्या की अव्यक्त संघर्षाचं दु:ख? पोलिस तपास पुढे काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.