
वय वाढत गेल्यावर माणसाला आधाराची गरज भासते. तरूणपणी लग्न करणं टाळणाऱ्यांनाही आयुष्याच्या उतारवयात कोणाचीतरी सोबत हवी असते. भारतीय वंशाच्या पण अमेरिकेत राहणाऱ्या एका 71 वर्षांच्या महिलेला अशीच सोबतीची गरज भासू लागली आणि ती 75 वर्षांच्या आजोबांच्या प्रेमात पडली. त्यांच्याशी लग्न करण्यासाठी ती अमेरिकेहून भारतात देखील आली. पण… त्यापुढे तिचा काही पत्ताच लागेना. 24 जुलैला भारतात, पंजाबला गेलेल्या बहिणीचा फोन सतत स्विच ऑफ लागल्यावर तिच्या अमेरिकेतील बहिणीने भारतातील अमेरिकन दुतावासातील अधिकाऱ्यांना कळवलं. त्यांनी पंजाबमधील अधिकाऱ्यांना फोन करून तपास करायला सांगितलं, पण त्यानंतर जे सत्य समेोर आलं त्याने महिलेची बहीणच नव्हे तर सगळेच अधिकारी घाबरले.
पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील किला रायपूर गावात अमेरिकेहून आलेल्या रुपिंदर कौर या 71 वर्षांच्या महिलेची बेसबॉल बॅटने मारहाण करून हत्या करण्यात आली. एवढंच नव्हे तर हत्येनंतर, मारेकऱ्याने मोठ्या प्रमाणात कोळसा मागवला आणि घराच्या आत आग लावून रुपिंदरचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. दोन-तीन दिवसांत मृतदेह राख आणि हाडे उरल्यानंतर, त्याने ते पोत्यांमध्ये भरले आणि नाल्यात फेकून दिले. घटनास्थळावरून पोलिसांनी काही हाडे, हातोडा आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच हा गुन्हा उघड झाला.
असा रचला हत्येचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे युकेमधील 75 वर्षीय चरणजित सिंग आणि लुधियाना जिल्हा न्यायालयात टायपिस्ट असलेला सुखजित सिंग उर्फ सोनू यांचा हात आहे. 75 वर्षांचा चरणजित सिंग इंग्लंडमध्ये राहतो आणि त्याने पूर्वी रुपिंदरशी लग्न करण्याचे मान्य केले होते. मात्र काही दिवसांनी त्याने या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण रुपिंदर ही लग्नासाठी अडूनच बसली होती, त्याच्यावर दबावा आणू लागली. तक्रार करून पोलिसांचं लचांड मागे लावे अशी धमकीही तिने दिली. अखेर त्याने तिला मारण्याचा कट रचला. चरणजीतने भारतात राहणाऱ्या सुखजीतला 50 लाख रुपये देण्याचे आणि युकेला बोलावण्याचे आमिष दाखवत रुपिंदरच्या हत्येसाठी तयार केलं.
बहिणीच्या तक्रारीनंतर उघड प्रकार
रुपिंदर या जुलैमध्ये भारतात आल्या, पण 24 तारखेपासून त्यांचा फोन लागत नव्हता, अखेर काही दिवसांनी त्यांच्या बहिणीने भारतातील अमेरिकन दूतावासाला ही माहिती देत मदत मागितली. त्याच वेळी अशी माहिती देखील समोर आली की (आरोपी) सुखजीतने 19 ऑगस्ट रोजी पोलिसात तक्रार दाखल केली की रुपिंदर बेपत्ता आहे. त्याने सांगितले की रुपिंदर जुलैच्या सुरुवातीला भारतात आला होती आणि सुमारे दहा दिवस त्याच्या घरी राहिली.18 जुलैला ती दिल्लीला गेली,आणि कॅनडातील एका लग्नासाठी जाणार असल्याचे तिने सांगितले होते, असा दावा सुखजीतने केला. त्यानंतर तिच्याशी काहीच संपर्क झाला नाही.
याप्रकरणी तपास सुरू केल्यावर काही गावकऱ्यांनी सांगितलं की सुखजितच्या एका खोलीत काळपट राख आणि धुराच्या खुणा होत्या. नूतनीकरण करताना नवीन रंग आणि नवीन टाइल्स लावल्याचेही दिलेस समावेश होता, ज्यामुळे गावात चर्चा सुरू झाली.यावरून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी कसून तपास सुरू केला. अखेर सुखजीतची चौकशी करताच त्याने गुन्हा कबूल केला, आपणच हत्या केल्याचे त्याने सांगितलं.
अतिरिक्त पोलिस उपायुक्त करणवीर सिंह म्हणाले की, तपासात असेही समोर आले आहे की रुपिंदर आणि 75 वर्षीय चरणजित सिंग हे भारतात आणि परदेशात अनेक वेळा भेटले होते. पोलिसांकडे त्यांचे एकत्र फोटो देखील आहेत. त्या महिलेला मारणारा सुखजीत सध्या पोलिस कोठडीत आहे, तर तिला मारण्याची सुपारी देणारे चरणजीत यूकेमध्ये आहे. या प्रकरणातील संपूर्ण सत्य उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.