Nagpur Crime : क्रूरतेचा कळस ! अवघ्या 9 वर्षांच्या मुलीला कोंडून ठेवले, शरीरावर सिगारेटचे चटके…

निरागस मुलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या, वाचल्या असतील. पण क्रूरतेचा कळस घटणारी ही घटना वाचून तुमचा थरकाप उडेल. एका सोसायटीमध्ये एक मुलीला गेल्या तीन वर्षांपासून कोंडून ठेवले होते. तिला यातना देण्यात आल्या. पण हे कोणी केलं ?

Nagpur Crime : क्रूरतेचा कळस ! अवघ्या 9 वर्षांच्या मुलीला कोंडून ठेवले, शरीरावर सिगारेटचे चटके...
| Updated on: Sep 04, 2023 | 1:11 PM

नागपूर | 4 सप्टेंबर 2023 : राज्यातील नागपूरमधून माणुसकी या शब्दाला लाज वाटेल, अशी घटना उघडकीस आली आहे. तेथे एका कुटुंबाने अवघ्या 9 वर्षांच्या मुलीवर एवढे अनन्वित अत्याचार (crime news) केले की ते ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी जेथे रहात होती तेथे केवळ तिला मारहाणच केली जात नव्हती तर तिच्या अंगावर गरम तवा, सिगारेट यांनी चटके दिले जात होते. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी कुटुंबाच्या निर्घृण कृत्याने लोक हैराण झाले आहेत. आता हे प्रकरण पोलिसांकडे असून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

ही घटना नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अथर्व सोसायटीतील आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर झालेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी आरोपी कुटुंबातील व्यक्तीने पीडित मुलीच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये दिले आणि मुलीला घरी आणले. तेव्हापासून तिला घरातच ओलीस ठेवण्यात आले होते. जेव्हा-जेव्हा आरोपी कुटुंबीय मुलीचा छळ करायचे, तेव्हा ती मुलगी जोरजोरात ओरडायची.

असा उघडकीस आला गुन्हा

तिचा आरडा-ओरडा ऐकून शेजाऱ्यांना संशय आला होता. एक दिवस आरोपी कुटुंब बंगळुरू येथे गेले मात्र पीडित मुलीला घरातच कोंडून ठेवले. तेव्हा ती मदतीसाठी हाक मारू लागली. शेजाऱ्यांनी घराचं कुलूप तोडून पीडितेल बाहेर काढलं आणि पोलिसांना माहिती दिली. तेव्हा तिला ओलीस ठेवल्याचे उघड झाले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीडितेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. आरोपी कुटुंबाला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.