‘इथे बसू नका, निघून जा’ असे सांगितले; टोळक्याने थेट इसमालाच…

सोसायटीच्या मागील पडीक जागेत काही तरुण गैरकृत्य करत होते. एका व्यक्तीने तरुणांना हटकले आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. यानंतर तरुणांनी जे केले त्याने सर्वच हादरले.

इथे बसू नका, निघून जा असे सांगितले; टोळक्याने थेट इसमालाच...
क्षुल्लक कारणातून टोळक्याने इसमाला संपवले
Image Credit source: TV9
| Updated on: May 01, 2023 | 3:11 PM

अभिजीत पोते, पुणे : सोसायटीच्या मागील जागेत गैरकृत्य करत असलेल्या तरुणांना हटकल्याने टोळक्याने 50 वर्षीय इसमाची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली. रवींद्र गायकवाड असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोयत्याने वार करून गायकवाड यांची निर्घृण हत्या केली. पुण्यातील केशवनगर भागात ही घटना घडली. चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकत्र येऊन गायकवाड यांना मारहाण करत त्यांची हत्या केली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय घडले नेमके?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रवींद्र गायकवाड हे गुरुकृपा सोसायटीच्या पाठीमागे असलेल्या जागेवर गेले असता, काही तरुण त्या ठिकाणी गैरकृत्य करत असल्याचे दिसून आले. याठिकाणी बसू नका आणि निघून जा, असे गायकवाड यांनी त्या तरुणांना सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून त्या तरुणांनी गायकवाड यांना शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की करायला सुरुवात केली.

काही वेळाने ते तरुण आणखी काही साथीदारांना घेऊन आले आणि गायकवाड यांच्यावर कोयत्याने आणि इतर शस्त्राने वार केला. या हल्ल्यात गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा तत्पूर्वी मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या विरोधात या परिसरातील सामान्य नागरिकांनी सर्व दुकानं बंद ठेऊन निषेध व्यक्त केला.