कोट्यवधींची संपत्ती आणि अभिनेत्रीशी कनेक्शन! चोर असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी 20 वर्षानंतर एका चोराला आपल्या जाळ्यात पकडलं आहे. मोठ्या चलाखीने त्याने इतकी वर्षे चोरी केली. इतकंच काय तर अभिनेत्रीला 22 लाखांचा एक्वेरियमही विकत घेऊन दिला. तसेच कोलकात्यात तीन कोटींचं घर घेतलं. पण एका चोरीमुळे पोलिसांच्या जाळ्यात बरोबर अडकला. कसं काय ते जाणून घ्या

कोट्यवधींची संपत्ती आणि अभिनेत्रीशी कनेक्शन! चोर असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Feb 08, 2025 | 6:00 PM

सोलापूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका चोराच्या बंगळुरु पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 37 वर्षीय पंचाक्षरी एस स्वामी गेल्या 20 वर्षांपासून चोरी करत आहेत. त्याने या 20 वर्षात अनेक ठिकाणी चोरी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने 2003 पासून चोरी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळेस अल्पवयीन होता. पण 2009 पर्यंत त्याने कोट्यवधि रुपयांची माया जमा केली. त्याच्याकडे असलेल्या संपत्तीमुळे राहण्याचा रुबाबच वेगळा होता. 2014-15 या कालावधीत तो एका अभिनेत्रीच्या संपर्कात आला होता. तिच्यावर त्याने कोट्यवधी रुपये खर्च केले. इतकंच काय तर तिला 22 लाखांचा एक्वेरियम विकत घेऊन दिला. यासह कोलकात्यात तीन कोटी रुपयांचं अलिशान घरही खरेदी केलं. पण इतकी वर्षे पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता. त्याची चोरी करण्याची पद्धतच वेगळी होती. त्यामुळे पोलिसांना त्याला पकडणं कठीण झालं होतं.

2016 साली गुजरात पोलिसांनी त्याचा मुसक्या आवळल्या आणि रवानगी तुरुंगात केली. पण जेलमध्ये राहून त्याच्यात फार काही बदल झाला नाही. त्यानंतरही तो चोरी करतच राहिला. 2024 मध्ये बंगळुरुत आल्यानंतर त्याने चोरीच्या घटना सुरु केल्या. रिकाम्या घरांची दिवसभर रेकी करायचा आणि रात्रीच्या वेळेस त्यात चोरी करायचा. इतकंच काय तर चोरी केल्यानंतर कपडेही बदलायचा. तो कायम एकटा चोरी करायचा. त्यामुळे त्याला पकडणं पोलिसांनी कठीण झालं होतं.

9 जानेवारी 2025 रोजी बंगळुरुच्या मारुतीनगरमधील एक घरात त्याने चोरी केली. या घरातून त्याने 14 लाख रुपयांचं सोन आणि चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला. तेव्हा आरोपीचा सुगावा लागला. पोलिसांनी त्याला बंगळुरूतच अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 33 ग्रॅम सोनं, 181 ग्रॅम वजन असलेलं सोन्याचं बिस्किट आणि एक हत्यार हस्तगत केलं आहे.