नागपूरमध्ये एमडी ड्रग्जच्या तस्करीचा पर्दाफाश, ड्रग्जसह एका आरोपीला अटक

नागपूर पोलिसांनी ड्रग्ज विरोधी कारवाई तीव्र केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई सतत सुरुच आहे. पोलिसांनी प्रतापनगर परिसरात सापळा रचून ड्रगविरोधी कारवाई केली आहे.

नागपूरमध्ये एमडी ड्रग्जच्या तस्करीचा पर्दाफाश, ड्रग्जसह एका आरोपीला अटक
नागपूरमध्ये एमडी ड्रग जप्त
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 29, 2023 | 6:49 PM

नागपूर / सुनील ढगे : नागपूरच्या गुन्हेशाखा पोलिसांनी एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला 34 ग्रॅम ड्रग्जसह अटक केली आहे. नागपूरच्या प्रतापनगर परिसरातून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीवर याआधी 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत. पोलीस आता आरोपीने हे ड्रग कुठून आणलं याचा शोध घेत आहेत. नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही धडक कारवाई केली. अंमली पदार्थ विरोधात पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

प्रतापनगर परिसरात एक इसम एमडी सारखे ड्रग घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित इसम तेथे फिरत असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. पोलिसांनी त्याच्या घराचीसुद्धा झडती घेतली असता 34 ग्रॅम एमडी ड्रग्स मिळून आले. या ड्रगजी बाजारात किंमत साडेतीन लाखाच्या वर असून, हे ड्रग विकून तो पैसा कमावण्याच्या तयारीत होता.

आरोपीवर आधीच अनेक गुन्हे दाखल

आोरपीवर याआधीच वेगवेगळे 25 ते 30 गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. पोलीस आता आरोपीने हे ड्रग कुठून आणलं आणि तो कोणाला देणार होता याचा शोध घेत आहे. नागपुरात याआधी सुद्धा ड्रग विरोधात अनेक कारवाया झाल्या. त्यात अनेक आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली. यावरून नागपूर सध्या ड्रग्जमाफीयांचं केंद्र बनत आहे की काय, असा प्रश्न पडला आहे.