
Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले आहे. पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यात फोटो आणि व्हिडिओ पुरावा म्हणून दिले आहे. त्यानंतर ते फोटो माध्यमांमध्ये आले. संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या पाहून बीडमधील केज तालुक्यातील जाणेगाव येथील तरुणाने आत्महत्या केली. अशोक हरिभाऊ शिंदे (वय 23) असे त्या तरुणाचे नाव आहे.
संतोष देशमुख यांना मारहाण झाल्याचे फोटो आल्यानंतर केजमध्ये बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये अशोक शिंदे यांनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर घरी आल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अशोक शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पुण्यात राहणारी बहीण अश्विनी माने हिला फोन करून हळहळ व्यक्त केली. मला टोकाचा पाऊल उचलावासे वाटत आहे, असे त्याने फोनवर सांगितले. बहिणीने त्याची समजूत काढूनही अशोक शिंदे यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे अशोक शिंदे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पोहचले. धनंजय देशमुख म्हणाले, संतोष भैय्यांचे फोटो पाहिल्यावर अशोक शिंदे काल भावना विवश झाले. ते नैराश्यामध्ये आले. केजच्या बंदमध्ये ते सहभाग झाले होते. कोणीही असे टोकाचे पाऊल उचलून नये. ज्यांनी चुकीची घटना केली, त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सर्वांनी सोबत राहायचे आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.
अशोक शिंदे यांचे भाऊ शिवराज शिंदे म्हणाले, मला अशोक याचा कॉल आला होता. मी कामात असल्यामुळे कॉल घेऊ शकलो नाही. त्यानंतर परत दुसरा कॉल आला. तो कॉल त्याने गळफास घेतल्याचा होता. अशोक शिंदे यांची बहीण अश्विनी माने म्हणाली, काल मला अशोकने कॉल केला होता. तो रडत होता. मी त्याला विचारले काय झाले? तर तो म्हणाला, देशमुख साहेबांचे फोटो बघून मला वाईट वाटत आहे. तो टोकाचे पाऊल उचलणार, असे सांगत होतो. मी त्याला समजवले. त्यानंतर त्याने फोन स्विच ऑफ केला. अशोक शिंदे यांचे वडील हरिभाऊ शिंदे म्हणाले, मी काल शेतात गेलो होतो. माझा मोबाईल बंद असल्यामुळे माझा संपर्क झाला नाही.