8 महिन्याच्या चिमुकलीला विकण्याचा प्रयत्न, विरार पोलिसांकडून टोळीचा भांडाफोड

| Updated on: Feb 10, 2021 | 9:02 PM

विवार पोलिसांनी या चिमुकलीची विक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

8 महिन्याच्या चिमुकलीला विकण्याचा प्रयत्न, विरार पोलिसांकडून टोळीचा भांडाफोड
Follow us on

विरार : अवघ्या 8 महिन्याच्या चिमुकलीची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये उघड झालाय. विवार पोलिसांनी या चिमुकलीची विक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यात 2 पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे. विक्रीचा प्रयत्न झालेल्या चिमुकलीची सुटका करुन पोलिसांनी तिची बालसंगोपन केंद्रात रवानगी केली आहे. विरार पोलिसांच्य या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.(Attempt to sell 8-month-old girl child in Virar)

या चिमुकलीची कहाणी ऐकल्यावर कुणालाही हळहळ वाटल्याशिवाय राहणार नाही. कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊनमध्ये या चिमुकलीच्या आईचं निधन झालं. तर वडील सोडून गेले होते. आईच्या निधनानंतर या चिमुकलीचा सांभाळ तिचे नातेवाईक करत होते. पण या अवघ्या 8 महिन्याच्या चिमुकलीची विक्री होत असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी मोठ्या शिताफीनं आरोपींना अटक केली आहे.

याबाबत विरार पोलीस ठाण्यात भादवी कलम 370 (1) 34 सह बाल न्याय अधिनियम सन 2015 कलम 79, 81 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई न्यायालयाने 4 ही आरोपीना 16 फेबुरवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सापळा रचून आरोपींना अटक

विरार पश्चिम बस स्थानक परिसरात 8 महिन्याच्या मुलीची विक्री करण्यासाठी एक टोळी येणार असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीम ने सोमवारी रात्रीच्या सुमारास सापळा लावला होता. लहान मुलीसह 4 जण संशयित दिसताच त्यांना ताब्यात घेऊन, चौकशी केली असता सदर धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

पोलिसांनी तात्काळ 8 महिन्याच्या चिमुरडीची सुखरूप सुटका करून, तिला प्रथम विरार पश्चिमेच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून, पुढील उपचार व संगोपन साठी मुंबई अंधेरी येथील एका बालसंगोपन केंद्रात पाठविण्यात आले आहे. विरार पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका चिमुरडीची सुखरूप सुटका झाली आहे. आता या टोळीने आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास ही पोलीस करत आहेत.

वसईत अंधश्रद्धेपोटी 15 लाखाची फसवणूक

दुसरीकडे वसईमध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका भोंदुबाबाने अल्लाचा प्रकोप होईल, अशी भीती दाखवून तब्बल 15 लाख 59 हजार 550 रुपयांना गंडा घातलाय. या प्रकरणात 2 जणांविरोधात वसई पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी फसवणूक केली असल्याची कलमं आहेत. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलीय.

मकसूद मोहम्मद हुसेन अन्सारी आणि असिफ इब्राहिम मेमन असं अटक करण्यात आलेल्या दोन भामट्यांची नावं आहेत. हे दोघेही वसईच्या पापडी परिसरातील राहणारे आहेत. वसईतील इलेक्ट्रिक व प्लंबिंगचं काम करणारे 49 वर्षीय व्यक्तीच्या मुलावर कोणत्या तरी प्रकारचा जादूटोणा करण्याची धमकी देण्यात आली होती. घरातील पैसे व सोन्या चांदीचे दागिने आणून दे, अन्यथा तुझ्यावर अल्लाचा प्रकोप होईल, अशी भीतीही घालण्यात आली. तसेच या प्रकोपापासून वाचण्यासाठी 15 लाख 59 हजार 550 रुपये किमतीचे 29.6 तोळे सोने, 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम घेण्यात आली.

संबंधित बातम्या :

पुण्यात ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर, सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी जादूटोणा झाल्याचा दावा

इंटरनेटवर नोकरीची जाहिरात, तरुणी सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या!, नागपूर पोलिसांकडून आरोपी गजाआड

Attempt to sell 8-month-old girl child in Virar