घटस्फोटाला नकार देणाऱ्या पत्नीला क्रूरपणे संपवलं, नाक-तोंड दाबलं अन्… पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरावणारं सत्य समोर

Badlapur Crime News : बदलापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एरंजाड गावात पत्नीची नाक-तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव पतीनं केला होता, मात्र आता सत्य समोर आलं आहे.

घटस्फोटाला नकार देणाऱ्या पत्नीला क्रूरपणे संपवलं, नाक-तोंड दाबलं अन्... पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरावणारं सत्य समोर
Badlapur Crime News
Image Credit source: Google
| Updated on: Jun 25, 2026 | 6:38 PM

गेल्या काही काळापासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अशातच आता बदलापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एरंजाड गावात पत्नीची नाक-तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव पतीनं केला होता, पण शेवटी पोस्टमॉर्टम रिपोर्टने बिंग फुटलं आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्या. पतीचे एका अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि तो पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. मात्र पत्नीने घटस्फोटाला नकार दिल्यानं पतीनं तिचा काटा काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

घटस्फोटासाठी दबाव

बदलापूरमधील या घटनेतील मृत महिलेचं नाव प्राजक्ता मेहेर आहे. तिचं 2010 साली बदलापूरच्या एरंजाड गावात राहणाऱ्या योगेश मेहेर सोबत लग्न झालं. त्यांना 15 आणि 11 वर्षांची दोन मुलंही आहेत. मात्र काही काळापासून योगेशचे गावातच राहणाऱ्या पूजा मेहेर नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. यातूनच योगेशने पत्नी प्राजक्ताला घटस्फोटासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. 14 मार्च 2026 रोही प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलावून हवे तितके पैसे घ्या, आणि मुलीला घेऊन जा, अशी ऑफर योगेशने दिल्याचा आरोप प्राजक्ताच्या वडिलांनी केला आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टने फुटलं बिंग

यानंतर 8 एप्रिल रोजी योगेश आणि प्राजक्तामध्ये पुन्हा भांडण झालं. 9 एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ताच्या माहेरच्यांना तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंदही केली. मात्र प्राजक्ताच्या माहेरच्यांनी संशय व्यक्त केल्यानं मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि व्हिसेरा सांभाळून ठेवण्यात आला. याचाच रिपोर्ट 23 जून रोजी आला, ज्यात प्राजक्ताचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला नसून नाक तोंड दाबून खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालं.

पोलिसांकडून तपासाला सुरुवात

आता बदलापूर पश्चिम पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत पती योगेश मेहेर आणि सासू अरुणा मेहेर यांना अटक केली आहे. तर या प्रकरणात योगेशची प्रेयसी पूजा मेहेर, तसंच नणंद हर्षदा कोंडीलकर, कुसुम बोराडे यांनाही आरोपी करण्याची प्राजक्ताच्या कुटुंबियांची मागणी आहे. आता त्यानुसार तपास सुरू असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us