
Crime News : गेल्या अनेक दिवासांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या मुलींबाबत वेगवेगळ्या घटना घडताना दिसत आहेत. ज्यामध्ये होस्टेलवर राहणाऱ्या मुलीवर होणारे अत्याचार आणि इतर ठिकाणी देखील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील निवाली येथे असलेल्या एकलव्य आदर्श शासकीय निवासी वसतिगृहात मंगळवारी रात्री घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. नववीत शिक्षण घेणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या स्टोअर रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी वसतिगृह प्रशासनावर गंभीर दुर्लक्ष आणि मानसिक दबाव टाकल्याचे आरोप करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
यामध्ये निवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आर. के. लोवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनीचे नाव अश्विनी रावताले असून ती पानसेमल तालुक्यातील गोंगवाडा गावची रहिवासी होती. ती निवाली येथील एकलव्य आदर्श निवासी शासकीय वसतिगृहात नववीत शिक्षण घेत होती.
आत्महत्या करण्याचं कारण काय?
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अश्विनी ही वसतिगृहातील बाथरूममध्ये कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असताना काही वरिष्ठ विद्यार्थिनींनी तिला पाहिले. यानंतर वरिष्ठ विद्यार्थिनींनी ही बाब व्यवस्थापकाकडे सांगण्याची धमकी दिल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे अश्विनी घाबरून गेली. तिने आपला मोबाईल फोन फेकून दिला आणि खोलीत जाण्याऐवजी जवळच असलेल्या स्टोअर रूममध्ये जाऊन तिने गळफास घेत आत्महत्या केली.
कशी उघडकीस आली घटना?
त्याच दिवशी संध्याकाळच्या जेवणासाठी अश्विनी न आल्याने तिच्या रूममेटने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी ती स्टोअर रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तातडीने व्यवस्थापकाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
एसडीएम पानसेमल रमेश सिसोदिया आणि तहसीलदारांनी याचा पंचनामा केला. पोलिसांनी विद्यार्थिनीचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून त्याची तपासणी सुरू आहे. मात्र, मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यास नकार दिला आणि वसतिगृह परिसरात जोरदार आंदोलन केले. वसतिगृह व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केला. प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.