आईचे हाल पाहवेना… सुपारी देऊन मोठ्या भावानेच लहान भावाला संपवलं; हत्याकांडाने शहर हादरलं

| Updated on: Nov 16, 2023 | 9:33 AM

Bhandara News : लाखनी शहरानजीक एका इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला होता. अखेर त्याच्या हत्येच गूढ उलगडलं असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

आईचे हाल पाहवेना... सुपारी देऊन मोठ्या भावानेच लहान भावाला संपवलं; हत्याकांडाने शहर हादरलं
Image Credit source: TV9 Network
Follow us on

शाहिद पठाण टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, गोंदिया | 16 नोव्हेंबर 2023 : दारू पिऊन आईला शिवीगाळ करतो, मारहाणही करतो… लहान भावाच्या या कृत्यांमुळे वैतागलेल्या आणि आईच हाल न पाहवल्यामुळे मोठ्या भावानेच लहान भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने भावाच्या सुपारीची हत्या देत त्याला संपवलं. सोमवारी मध्यरात्री लाखनीत घडलेल्या हत्याकाडांमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्याच्या अंगावर मोठमोठ्या जखमा होत्या. लाखनी येथील खेडेपार मार्गावर रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह सापडला होता. अखेर याप्रकरणी लाखनी पोलिसांनी मोठ्या भावासह तिघांना बेड्या ठोकत अटक केली.

आकाश भोयर (31) असे मृत इसमाचे नाव असून त्याचा मोठा भाऊ मोठा भाऊ राहुल भोयर (33) यानेच त्याच्या हत्येची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी राहूल याच्यासह सुभेंद्र उर्फ मोनू न्यायमूर्ती (27) आणि कार्तिक मांढरे (24) या दोघांनाही अटक केली.

दारू पिऊन द्यायचा त्रास, धिंगाणाही घालायचा..

मृत आकाश भोयर आणि त्याचा भाऊ राहूल हे दोघेही लाखनी शहरानजीक असलेल्या सावरी येथील वडिलोपार्जित घरात रहायचे. मात्र आकाश याला दारूचे व्यसन लागले होते. तो सतत दारू प्यायचा आणि नशेत घरी येऊन म्हाताऱ्या आईला शिवीगळा करायचा, अनेकदा मारहाणही करायचा. एवढेच नव्हे तर दारू पिऊन शेजाऱ्या-पाजाऱ्यांनाही त्रास द्यायचा. त्याचा मोठा भाऊ राहूल याने त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो काही सुधारत नव्हता. दारू पिऊन त्याचा रोजचा धिंगाणा सुरूच होता.

आईला ज्याच्यामुळे त्रास होतोय आणि सगळ्या कुटुंबाची वाताहत होते आहे, अशा भावाला संपवण्याचा प्लान राहुलने आखला. त्यानंतर राहुलने त्याचा मित्र मोनू न्यायमूर्ती आणि कार्तिक मांढरे यांना सुपारी देत, त्यांच्या मदतीने सोमवारी रात्री आकाशला दारू पाजून लाखनी शहराजवळ असलेल्या खेडेपार मार्गावर नेले. तिथेच त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. यामध्ये त्याला 30 ते 35 गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यानंतर आरोपींनी त्याला दूर अंतरावर फरपटत नेऊन तिथेच त्याचा मृतदेह फेकला.

पोलिसांसमोर कबूल केला गुन्हा

लाखनीनजीक एका इसमाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. संशयाच्या आधारे लाखनी पोलिसांनी मृतकाचा मोठा भाऊ राहुल याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. तेव्हा घाबरून त्यानेच भावाच्या हत्येची सुपारी दिल्याचे कबूल केले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचे इतर दोन साथीदार सुभेंद्र आणि कार्तिक यांनाही ताब्यात घेत तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत अटक केली. या तिघांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून लाखनी पोलीस अधिक तपास करीत आहेत.