
पाटणा | 2 ऑक्टोबर 2023 : मोह, मग तो कसलाही असो वाईट असतो. लहान असो वा मोठा, एखाद्या गोष्टीचा मोह झाला की मग ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशावेळी नाती गोती, आपली माणसं वगैरे काहीही दिसत नाही. डोळ्यांवर मोहाची पट्टी असते, त्या भरात माणूस काहीही करू शकतो. अशाच मोहापायी मुजफ्फरपुरमध्ये नात्यांवरचा विश्वास उडेल अशी घटना घडली आहे.
ज्या मोठ्या भावाने आपल्याला अंगाखांद्यावर खेळवलं, संकटाच्या वेळेस जो पहाडासारखा पाठीशी उभा राहिला, ज्याने आपल्यावर प्रेम केलं त्याच भावाला एका क्षणात संपवल्याचा धक्कादायक गुन्हा (crime news) छोट्या भावाने केला. लहान भावाने मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. मृताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. खून केल्यानंतर आरोपी फरार आहे.
जमिनीच्या वादातून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, जमीनीवरून झालेल्या वादातूनच बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये ही हत्या घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्थानिक लोकांनी पोलिसांना सांगितले की, मृत गोनौर साहनी हा तीन भावांमध्ये मधला होता. मोठ्या भावाचे नाव शंकर तर धाकट्या भावाचे नाव रवी साहनी आहे. त्या दोन भावांमध्ये यापूर्वीही जमिनीच्या वादावरून भांडण झाले होते.
छोट्या भावाने घेतला मोठ्या भावाचा जीव
खापूर धाब्यावर 15 एकर जमीन होती. त्यापैकी पाच एकर जमीन आजोबांच्या नावावर होती आणि दहा एकर जमीन आईच्या नावावर होती. लहान भाऊ रवी साहनी यांने त्यांच्या आईच्या जमिनीपैकी नऊ एकर जमीन शेखपूर ढाब्यातील एका व्यक्तीला विकली होती. मात्र मोठा भाऊ शंकर आणि मधला भाऊ गौनौर साहनी यांनी त्याला विरोध केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल केली होती.
कसाबसा चालवत होता घर
मृत गौनौर हा ठएक ठेला चालवून कसाबसा पैसे कमावत होता. मात्र जमिनीच्या मुद्यावरू त्याचे छोट्या भावाशी वाजले होते. यामुळे रवी हा संतापला होता. त्याच भांडणातून त्याने भावाचा काटा काढायचे ठरवले आणि मोठा भाऊ गौनौर हा झोपलेला असतानाच त्याने गळा चिरून त्याची हत्या केली. या हत्येनंतर तो फरार झाला.
आरोपी रवीने गौनौरची हत्या केली. त्यांच्यात खूप पूर्वीपासून जमीनीबद्दल वाद सुरू होता. हत्येनंतर तो फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.