
कबीरधाम : छत्तीसगडमधील कबीरधाम येथे खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी लग्न झाले म्हणून प्रियकराने केले ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. तीन दिवसापूर्वीच तरुणाचा विवाह झाला होता. विवाहत एक म्युझिक सिस्टिम गिफ्ट आला होता. लग्नानंतर सर्वजण लग्नातील गिफ्ट पाहत होते. म्युझिक सिस्टम पाहून घरच्यांनी तो प्लगला लावला आणि सुरु करताच मोठा धमाका झाला. यात नवरदेवासह त्याचा भाऊ ठार झाला, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला असता धक्कादायक माहिती समोर आली.
छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात हेमेंद्र मारवी या तरुणाचा 1 एप्रिल रोजी विवाह झाला होता. यावेळी जोडप्याला लग्नात एक म्युझिक सिस्टम गिफ्ट मिळाले होते. लग्नानंतर तीन दिवसांनी सोमवारी घरचे सर्वजण लग्नात आलेले गिफ्ट पाहत होते. यावेळी सर्वजण गिफ्ट आलेले म्युझिक सिस्टम लावून पाहत होते. मात्र म्युझिक सिस्टम प्लगला लावून सुरु करताच त्याचा स्फोट झाला. या स्फोटात हेमेंद्रसह त्याच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. या प्रकरणाच्या तपासानंतर पोलिसांनी म्युझिक सिस्टीममध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. वधूच्या पहिल्या प्रियकरानेच हा स्फोट घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. प्रेयसीने दुसऱ्याशी विवाह केल्याने तिला अद्दल घडवण्यासाठी आरोपीने हे कृत्य केले.
खरे तर हे संपूर्ण प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे. मध्य प्रदेशात राहणाऱ्या संजू मरकम या तरुणाचे ललिता नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला आणि प्रेयसी ललिताच्या नातेवाईकांनी तिचे हेमेंद्र मेरावीशी लग्न लावून दिले. यामुळे संजूने प्रेयसीला इजा पोहचवण्याचा प्लॅन केला होता.
आरोपीने प्रेयसीला लग्नाचे गिफ्ट देण्यासाठी होम थिएटर विकत घेतले आणि त्यात स्फोटके भरुन प्रेयसीच्या सासरच्या घरी पाठवली. पोलिसांनी आरोपी सरजू मरकम या नवविवाहित महिलेचा प्रियकर याला अटक केली आहे.