फेसबुकवर पोस्ट करुन डॉक्टर प्रेयसीला संपवले, मग स्वतःला संपवण्याचा प्रयत्न

डॉक्टर प्रेमी युगुलामध्ये काही कारणातून वाद झाला. या वादानंतर प्रियकराने प्रयेसीला थेट संपवल्याची घटना जम्मूमध्ये घडली आहे. यानंतर प्रियकराने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.

फेसबुकवर पोस्ट करुन डॉक्टर प्रेयसीला संपवले, मग स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
प्रेमसंबंधातील वादातून प्रियकराने प्रेयसीला संपवले
| Updated on: Mar 10, 2023 | 6:55 PM

जम्मू : प्रियकराला भेटायला आलेल्या प्रेयसीचे काही कारणावरुन प्रियकराशी वाद झाले. या वादातून प्रियकराने चाकूने वार करुन डॉक्टर प्रेयसीची हत्या केली. मग स्वतःही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. गुन्हा करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे आपण आपले जीवन संपवणार आहोत, असे लिहिले होते. डॉ. सुमेधा शर्मा असे मयत प्रेयसीचे नाव आहे, तर जौहर गनई असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेंटल कॉलेजमध्ये जुळले प्रेमसंबंध

सुमेधा आणि जौहरचे प्रेमसंबंध होते. दोघांनीही डेंटल कॉलेजमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीची डिग्री घेतली होती. कॉलेजमध्येच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. बॅचलर डिग्री घेतल्यानंतर सुमेधा एमडीएस करत होती. होळीच्या सुट्टी निमित्ताने ती घरी आली होती. यावेळी ती आपल्या प्रियकराला भेटायला त्याच्या घरी गेली. प्रियकराच्या घरी दोघांमध्ये काही कारणातून वाद झाला.

आधी प्रेयसीला संपवले, मग स्वतःला संपवण्याचा प्रयत्न

हा वाद इतका विकोपाला गेला की जौहरने चाकूने सपासप वार करत सुमेधाची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःवरही चाकूने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जौहरला रुग्णालयात दाखल केले. जौहरची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.