तरुणाने रात्री स्वप्न पाहिलं, जाग येताच आक्रित घडलं; नेमकं प्रकरण काय?

नेहमीप्रमाणे रात्री जेवण करुन भावोजी आणि मेव्हणा झोपी गेले. मध्यरात्री मेव्हण्याला एक स्वप्न पडले. यानंतर जे घडले त्याची कुणीही कल्पना केली नसेल.

तरुणाने रात्री स्वप्न पाहिलं, जाग येताच आक्रित घडलं; नेमकं प्रकरण काय?
तरुणाने एक स्वप्न पाहिले, मग विपरीत घडले
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 10, 2023 | 8:30 PM

खुंटी : झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील सायको पोलीस स्टेशन परिसरात हत्येची एक विचित्र घटना समोर आली आहे. अनेकदा हत्येमागे विशिष्ट कारण असते. पण झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील सायको पोलीस स्टेशन हद्दीतील गिंडुंग गावात हत्येची अनोखी घटना समोर आली आहे. हत्येमागील कारण जाणून ग्रामस्थांसह पोलीस कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. हत्या करणारा आणि मयत झालेला दोघे मेव्हणा-भावोजी आहेत. मेव्हण्यानेच आपल्या भावोजीची बेदम मारहाण करत हत्या केल्याचे उघड झाले आहे. सायको पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी गोपाल मुंडा याला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली.

गिंडुंग गावातील रहिवासी गोपाल मुंडा नावाच्या व्यक्तीने आपला भावोजी गलू मुंडा याला काठीने मारहाण केली. भावोजी गलू मुंडा याची हत्या केल्यानंतर आरोपी रात्रभर आपल्या भावोजीच्या मृतदेहाजवळ झोपला. सकाळी मेव्हण्याने आपल्या भावोजीची हत्या केल्याची माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी तात्काळ सायको पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी आरोपीला अटक केली

हत्येची माहिती मिळताच सायको पोलीस ठाण्याचे पोलीस गिंडुंग गावात पोहोचले आणि त्यांनी आरोपी मेव्हणा गोपाल मुंडा याला अटक केली. आरोपी गोपाल मुंडा याच्या सांगण्यावरून पोलिसांनी हत्येत वापरलेली रक्ताने माखलेली काठीही जप्त केली आहे. पोलिसांनी गलू मुंडा याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला.

स्वप्न पाहिले अन् भावोजीला मारले

आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले की, तो रात्री आपल्या भावोजीसोबत झोपला होता. दरम्यान, त्याला स्वप्न पडले की त्याचा भावोजी गलू मुंडा त्याला बेदम मारहाण करत आहे. त्याच दरम्यान त्याला अचानक जाग आली आणि त्याने आपल्यासोबत झोपलेल्या भावोजीला काठीने बेदम मारहाण केली.

आरोपी मानसिक रुग्ण

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोपाल मुंडा याची मानसिक स्थिती ठीक नाही. यामुळे त्याचा भावोजी त्याला घराबाहेर जाण्यास मनाई करत असे. त्यामुळे गोपाल मुंडा आपल्या भावोजीवर रागवायचा. मात्र, नुसते स्वप्न बघून भावोजीला अमानुषपणे मारहाण करून ठार मारण्याची एवढी संतापजनक घटना मेव्हण्याने कशी काय घडवली असेल, यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत नाही. स्वप्न पाहिल्यानंतर मेव्हण्यानेच भावोजीला बेदम मारहाण केल्याची घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.