
बार्शी तालुक्यात हॉटेलमध्ये जेवणाच्या भांडणातून चौघांनी मिळून दोघांवर चाकूने वार करत तसेच लोखंडी गड, लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुर्डूवाडी- बार्शी – लातूर बाह्यवळण रस्त्यावर हा हल्ला झाला. ‘तुला लय माज आला काय, तू तुझे हॉटेल कसे चालवितो’ असे म्हणून शिवीगाळ करून आकाश काशिद व अमोल काशीद या दोन तरूणांवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सोमनाथ ननवरे, रोहन कांबळे, वीर नामक व्यक्तीसह अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बार्शीतील नागोबाचीवाडी गावाजवळील हॉटेल सिंहगड समोरील ही घटना आहे. मात्र या घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. एवढंच नव्हे तर जखमी व्यक्तीचा जबाब घेण्यासाठी पोलीस अद्यापही हॉस्पिटलमध्ये आले नाहीत. यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
किरकोळ कारणावरून दोघांना बेदम मारहाण
पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवत आकाश काशिद व अमोल काशीद या दोघांना सोमनाथ ननवरे , रोहन कांबळे दोघे रा. कॅन्सर चौक, बार्शी , वीर व अनोळखी एका व्यक्तीने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी अमोल काशीद यांनी तालुका पोलीस ठाणं गाठून सदर प्रकार कथन करत फिर्याद दाखल केली.
त्याने फिर्यादीत दिलेल्या जबाबानुसार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अमोल याला त्याचा भाऊ आकाश याचा फोन आला. रात्री वाढदिवसानिमित्त गेल्यावर एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना आकाश व ननवरे या दोघांमध्ये जेवणाच्या कारणावरून किरकोळ भांडण झाले होते . त्यामुळे सोमनाथ ननवरे हा मला मारण्यासाठी पोर घेवून यायला लागला आहे.मी आपल्या हॉटेल जवळ थांबलेलो आहे, असे आकोशने अमोल याला सांगितलं.
त्यानंतर फिर्यादी अमोल हा आकाशला घरी घेऊन जाण्यासाठी आला, तेव्हा तिथे आकाश याच्यासोबत मनोज पवार, सोमनाथ थांबले होते. मात्र तेव्हा ननवरे हा तिथे आला व त्याने आकाशला शिवीगाळ केली. तेवढ्यात तेथे मोटार सायकलवरून रोहन कांबळे व त्याच्या सोबत वीर आणि आणखी एक जण आला. रोहनच्या हातात फरशी कु-हाड, वीरच्या हातात लाकडी दांडके व दुसऱ्या तरूणाच्या हातात लोखंडी गज होता. तुला लय माज आला काय, तु तुझे हॉटेल कसे चालवतो, असे विचारत ननवरे याने आकाशला शिवीगाळ केली आणि त्याच्यावर चाकूने वार केले.
ते पाहून अमोल हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला असता सोमनाथ ननवरे याने त्यालाही मारहाण केली ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तर त्यावेळी तेथे असलेले रोहन कांबळे याने हातातील फरशी कुऱ्हाड उलटी करून व वीर याने लाकडी दांडक्याने व इतर एकाने लोखंडी गजाने आकाशच्या पाठीवर, दोन्ही पायावर बेदम मारहाण केली. लाकडी दांडका डोक्यातही मारला. एवढंच नव्हे तर तु हॉटेल कसं चालवतो, तुला बघू घेतो, तु जर उदया हॉटेल उघडले तर तुला जीवे ठार मारेन अशी धमकी ननवरे याने दिली, असा उल्लेख फिर्यादीमध्ये आहे. या सर्व प्रकरणाचा तालुका पोलिस अधिक तपास करत आहेत.