बापाचा खून केला, प्रेत घरात पुरलं, दुर्गंध येताच….भयंकर खुनाने संभाजीनगर हादरलं!

सध्या हत्येची एक अजब आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नराधम मुलाने आपल्याच बापाचा खून करून मृतदेह घरात पुरून टाकला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

बापाचा खून केला, प्रेत घरात पुरलं, दुर्गंध येताच....भयंकर खुनाने संभाजीनगर हादरलं!
chhatrapati sambhajinagar crime news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2025 | 9:25 PM

Chhatrapati Sambhaji Nagar Paithan Murder Case : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हत्या, बालात्काराच्या गुन्ह्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. चोरी, दरोडा यासारख्या घटना तर रोजच घडत आहेत. त्यामुळेच राज्यात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. पुणे, नांदेड, मुंबई, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांतही खुनाच्या अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. असे असतानाच आता छत्रपती संभाजीनगरात हादरवून टाकणारा खून झाला आहे. मुलानेच आपल्या बापाचा जीव घेतला आहे. प्रेताला दुर्गंधी आल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कडेठाण या गावात खुनाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे लेकानेच बापाचा खून केला आहे. बापाल मारून या आरोपीने प्रेत तब्बल दहा दिवस घरातच गाडून टाकले होते. कल्याण बापूराव काळे (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर रामेश्वर कल्याण काळे असे आरोपी मुलाचे नाव आहे.

खुनाचा उलगडा कसा झाला?

आरोपी रामेश्वार काळे याने दहा दिवसांपूर्वी आपल्याच वडिलाचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर ही त्याने लगेचच आपल्या वडिलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. मृतदेह घराबाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावणे अवघड असल्याचे समजताच त्याने घरात मोठा खड्डा केला. त्याने मृतदेह घरातच पुरून टाकला. त्यानंतर तब्बल दहा दिवस तो निवांत राहिला. परंतु घरातून दुर्गंधी येत असल्याने घटनेला वाचा फुटली.

पोलीस मोठा फौजफाटा घेऊन दाखल, आरोपी ताब्यात

स्थानिकांनी या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आरोपीच्या घरावजळ मोठा फौजफाटा घेऊन गेले होते. आरोपी मुलगा रामेश्वर काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी रामेश्वर याने बापाचा खून का केला? याचा पोलीस आता तपास करत आहेत. परंतु या घडलेल्या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या तिथे तणावाचे वातावरण आहे.