अचानक सर्व दरवाजे बंद केले अन्..; पवई स्टुडिओत काय घडलं? ओलिसांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

ऑडिशनसाठी बोलावून कथित सामाजिक कार्यकर्ता रोहित आर्याने 17 अल्पवयीन मुलांसह एकूण 19 जणांना ओलीस ठेवलं होतं. पवईतल्या स्टुडिओमध्ये ही घटना घडली होती. त्या स्डुडिओत नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

अचानक सर्व दरवाजे बंद केले अन्..; पवई स्टुडिओत काय घडलं? ओलिसांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
प्रत्यक्षदर्शी
Image Credit source: Tv9
| Updated on: Oct 31, 2025 | 3:32 PM

शॉर्टफिल्मच्या ऑडिशनसाठी बोलावून 17 अल्पवयीन मुलांना पवईमधील स्टुडिओमध्ये एका कथित सामाजिक कार्यकर्त्याने ओलीस ठेवलं. पोलिसांनी वॉशरुममधून प्रवेश करून 17 मुलांसह एकूण 19 जणांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अपहरणकर्ता रोहित आर्या याचा मृत्यू झाला. सुमारे अडीच तास हे अपहरणनाट्य रंगलं होतं. या अडीच तासादरम्यान नेमकं काय घडलं, स्टुडिओच्या आता काय घडत होतं, याचा थरारक अनुभव ओलिसांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितला आहे. आरोपी रोहित आर्याने काही दिवसांपूर्वी पवईतील ‘आर ए’ स्टुडिओतील एक सभागृह भाड्याने घेतलं होतं. त्या सभागृहात गेल्या 6 दिवसांपासून एका शासकीय शॉर्टफिल्मसाठी ऑडिशन्स घेतल्या जात होत्या. आरोपीने त्यासाठी जाहिरात दिली होती.

वृद्ध महिलेनं सांगितला अनुभव

“मुलीची शूटिंग होती म्हणून मी त्या स्टुडिओमध्ये गेले होते. एकदमच दंगा झाला. सरांनी त्या मुलांसोबत मला पहिल्या माळ्यावर बसवलं होतं. दंगा झाल्यावर त्या मुलांचे आईवडील रडत होते. मला शंका आली की काहीतरी झालंय. काय झालं, काय झालं विचारत मी पडदा उघडला तर बाहेर सगळेच रडत होते,” असं वृद्ध महिलेनं सांगितलं.

संबंधित वृद्ध महिलेच्या नातीनेही तिचा अनुभव सांगितला. “स्टुडिओवाल्यांना त्यांनी खाली बसवलं होतं आणि आम्हाला वर बसवलं होतं. थोडा वेळ त्यांनी (रोहित आर्या) दरवाजा उघडा ठेवला आणि त्यानंतर अचानकच त्यांनी तो बंद केला. सगळे दरवाजे, खिडक्या बंद केले. आम्हाला वाटलं की कुठला तरी सीन सुरू आहे आणि आमचा आवाज होत असेल म्हणून बंद केला. पण थोड्या वेळाने आमच्या आईवडिलांचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू येत होता. मग माझ्या आजीने आईला फोन केला, त्यामुळे नेमकं काय सुरुये ते आम्हाला कळालं. हळूहळू मग आजीने आम्हा सगळ्यांना वाचवलं.”

मुलांना ओलीस ठेवल्याचा व्हिडीओ तयार करून रोहित आर्याने तो त्यांच्या पालकांना पाठवला होता. “मी दहशतवादी नाही, माझी पैशांची मागणी नाही. मला फक्त संवाद साधायचा आहे. मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. त्यासाठी मी हे सर्व करतोय”, असं त्याने या व्हिडीओत म्हटलं होतं. पोलिसांनी धोका न पत्करता वॉशरुमची खिडकी तोडून स्डुडिओच्या सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर पोलिसांनी दुपारी साडेतीन वाजता 17 अल्पवयीन मुलं आणि दोन कर्मचारी अशा एकूण 19 जणांची सुखरुप सुटका केली.

पवईतील किडनॅपिंग केस प्रकरणातील जखमी आजीसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संवाद साधला. शिंदेंनी आजीचं कौतुक केलं. आजीने धाडस दाखवल्यामुळे 17 मुलं वाचली होती.