कोरोना लसीकरणाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, सायबर सेलकडून सावधानतेचा इशारा!

कोरोना लस नोंदणी लिंक, असा कोणताही मेसेज तुमच्या मोबाईलवर आला असेल, तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:23 PM, 14 Jan 2021

मुंबई : देशभरात लवकरच कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. लशीची पहिली तुकडी राज्यातील लसीकरण केंद्रांवर पोहोचली आहे. ही लसीकरण प्रक्रिया भारतात 16 जानेवारीपासून सुरू होईल. परंतु, यादरम्यान सायबर गुन्हेगारही देखील सक्रिय झाले आहेत. सायबर फ्रॉड सतत वेगवेगळ्या मार्गांनी सतत लोकांची फसवणूक करत आहेत. गेल्या काही दिवसांत सायबर क्राईमच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे (Corona Vaccine cyber crime alert).

आता सायबर क्राईम ठग आपल्या स्मार्टफोनवर कोरोना लसी नोंदणीची लिंक पाठवून फसवणूक करत आहेत. कोरोना लस नोंदणी लिंक, असा कोणताही मेसेज तुमच्या मोबाईलवर आला असेल, तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या लिंकवर क्लिक केल्याने, आपल्या बँक खात्यातील संपूर्ण पैसे लुटले जाण्याची शकतात. गेल्या काही दिवसांपासून अशी प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आता पोलिसही या प्रकरणांचा तपास करत आहेत. त्याचबरोबर सायबर सेलने लोकांना या संदर्भात सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे.

कोरोना लस नोंदणीच्या नावाखाली फसवणूक

वास्तविक, सायबर क्राईमशी संबंधित या चोरट्यांनी नोएडामध्ये राहणाऱ्या बर्‍याच लोकांना बळीचा बकरा बनवले आहे. या प्रकरणांमध्ये लोकांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे एक लिंक पाठवून त्यांना त्यावर क्लिक करण्यास सांगितले गेले होते. या मेसेजमध्ये असे लिहिले होते की, जेव्हा तुम्ही या लिंकवर क्लिक कराल तेव्हाच तुमची कोरोना लस नोंदणी पूर्ण होईल. पण, लोक या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या खात्यातून आणि ई-वॉलेटमधून लगेच पैसे काढून घेण्यात आले (Corona Vaccine cyber crime alert).

या व्यतिरिक्त बरेच लोक सरकारच्या वतीने लिंक जारी करून नोंदणीबाबत असल्याचे सांगत आहेत. लोकांना कोरोना लस मोफत देत असल्याचे सांगत सायबर फसवणूकीमध्ये अडकवले जात आहे. एवढेच नव्हे तर, सायबर गुन्हेगार आपल्याला लवकर व कोणत्याही कटकटीशिवाय कोरोन लस मिळवून देण्याचे आमिष देऊन मोबाईलवर आलेला मेसेज ओटीपीसह पाठवण्यास सांगतात. त्यानंतर ते नोंदणीसाठी तुमच्याकडचा ओटीपी देण्याची विनंती करता. जेव्हा तुम्ही या सायबरला गुन्हेगाराला ओटीपी पाठवता, त्याक्षणी तुमच्या बँक खात्यातून पैसे डेबिट केले जातात.

अशा गुन्हेगारांना कसे टाळाल?

कायम लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की, कोव्हिड लसीची नोंदणी आपल्या फोनवर मेसेजद्वारे किंवा कॉलद्वारे घेतली जाईल, अशी कोणतीही माहिती सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेली नाही. आपल्या फोनवर आलेल्या अशा कुठल्याही मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका. व्हॉट्सअ‍ॅपवर असे कोणतेही मेसेज प्रसारित झाले असल्यास त्यावर कोणत्याही प्रकारची माहिती सामायिक करू नका. जर कोणी आपल्याला कॉल केला आणि फोनवर पाठवलेल्या ओटीपीची माहिती विचारली, तर ती अजिबात देऊ नका. तसेच, जर कोणी तुम्हाला कोरोना लस देण्यासंदर्भात काही सांगत असेल तर, त्यावर विश्वास ठेवू नका. अशा सायबर क्राईमबद्दल लोकांना सतर्क ठेवणे आणि त्याची जागरूकता वाढवणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.

(Corona Vaccine cyber crime alert)

हेही वाचा :