
Cyber Fraud : तंत्रज्ञानाचा काही लोक चांगल्या कामांसाठी वापर करतात. तर काही लोक याच तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांची लूट करतात. लुटमारीचे असे अनेक अचंबित करणारे प्रकार आतापर्यंत समोर आलेले आहे. यालाचा कायद्याच्या भाषेत सायबर फ्रॉड असेही म्हटले जाते. सायबर फ्रॉड होऊ नये म्हणून पोलीस नागरिकांना वेळोवेळी आवाहन करत असतात. मात्र असे असूनही अशा प्रकारचे घोटाळे घडतच राहतात. सध्या असाच एक अजब आणि अचंबित करणारा प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीची सगळीकडे चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेला समोरच्या व्यक्तीने चक्क अंतराळवीर असल्याचे भासवत लाखो रुपयांना फसवले आहे. फसवणुकीचा हा प्रकार जपानमधील आहे. मी अंतराळयानात फसलो आहे. ऑक्सिजन संपला आहे. मला आणखी ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी पैसे हवे आहेत, असे म्हणत आरोपीने महिलेला फसवले आहे. विशेष म्हणजे सायबर फ्रॉडला बळी पडलेल्या या महिलेनेही आरोपीवर विश्वास ठेवून लाखो रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले आहेत.
या घटनेचे वृत्त जपानमधील काही वृत्तपत्रांत छापून आले आहे. याच वृत्तांनुसार पीडित महिला ही नोकरीवरून निवृत्त झालेली आहे. मिळत असलेल्या पेन्शनवर ती तिचा चरितार्थ चालवते. आरोपी आणि या महिलेची ओळख ही सोशल मीडियावर झाली. सोशल मीडियावरच या दोघांमध्ये मैत्री वाढत गेली. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने महिलेला मी अंतराळवीर असल्याचे सांगितले. तसेच मी सध्या अंतराळयानात असून पृथ्वीला प्रदक्षीणा घालत आहे. माझ्या अंतराळयानावर हल्ला झाला आहे. माझ्याजवळ असलेला ऑक्सिजन संपत आला आहे. नवा ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी मला काही पैशांची गरज आहे, असे आरोपीने या महिलेला सांगितले. आरोपीने महिलेला एकूण 10 लाख येन (सहा लाख रुपये) पाठव अशी विनंती केली. विशेष म्हणजे महिलादेखील त्याच्या जाळ्यात फसली. महिलेने त्याला ऑनलाईन पद्धतीने हे सगळे पैसे पाठवले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी केली असता महिला संबंधित आरोपीवर भाळली असल्याचे समोर आले. याच प्रेमापोटी महिलेने आरोपीला पैसे पाठवले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर आता काही लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. अंतराळवीर कसा आपल्याला बोलू शकतो? अंतराळातून अशा प्रकारे सोशल मीडियावर बोलणे शक्य आहे का? असे प्रश्न संबंधित महिलेला का पडले नाहीत, असा सवाल लोक उपस्थित करत आहेत. तर पोलीस आरोपीचा शोध घेत असून लवकरच तो कचाट्यात सापडेल अशी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.