दिवाळी सवलतींच्या नावाने सायबर फसवणूकीत वाढ, पोलीस ठाण्यात 887 तक्रारी

| Updated on: Nov 13, 2023 | 3:06 PM

दिवाळी सवलतींच्या नावाने अनेकांची सायबर फसवणूक झाली असून आत्तापर्यंत पोलीस ठाण्यांत 887 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झाली असेल तर लवकरा लवकर सायबर पोलिसांशी संपर्क साधावा

दिवाळी सवलतींच्या नावाने सायबर फसवणूकीत वाढ, पोलीस ठाण्यात 887 तक्रारी
Follow us on

मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : दिवाळीनिमित्त दुकानांमध्ये आणि विविध प्रॉडक्ट्सवर भरपूर सवलती देण्यात येतात. मात्र त्यामध्ये फसवणूक होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. या सणानिमित्त सवलती आणि बँक केवायसीच्या नावाखाली समाज माध्यमे, तसेच ईमेलद्वारे लिंक पाठवून सायबर फसवणुकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिवाळी सवलतींच्या नावाने अनेकांची सायबर फसवणूक झाली असून आत्तापर्यंत पोलीस ठाण्यांत 887 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

धक्कादायक गोष्ट म्हणजे फसवणूक झालेल्यांनी आरोपींनी ‘ओटीपी’ दिलेला नससतानाही किंवा त्यासंदर्भात कोणतीच माहिती शेअर केलेली नसतानाही क्रेडिट कार्डमधून परस्पर व्यवहार होत असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत फसवणूक करून, पैशाचा अपहार झाल्याच्या एकूण 887 तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या. पण या फसवणुकीच्या प्रकरणांची उकल होण्याचे प्रमाण अगदी कमी, म्हणजे केवळ आठ टक्के इतकेच आहे.

सणासुदीचे दिवस असल्यामुळे सायबर फसवणूक करणाऱ्यांचं चांगलंच फावलं आहे. विविध सूट देण्याच्या नावाखआली किंवा ऑफर्सचे आमिष दाखवून हे भामटे त्यांचा फायदा करून घेतात. त्याद्वारे ग्राहाकांना संदेश पाठवले जातात. तर काही प्रकरणांमध्ये मात्र क्रेडिट कार्डच्या केवायसीच्या नावाखाली मेसेजेस पाठवण्यात येत आहेत. अशा लिंकवर क्लिक केले तर मोबाईलचा अॅक्सेस आरोपींना मिळतो. त्यामुळे समोरील इसमाच्या मोबाईलचे व्यवहार
मोबाइल स्क्रीनद्वारे आरोपींना समजतात. तसेच ते ओटीपीही पाहू शकतात. त्यामुळे ओटीपीविषयी माहिती शेअर केली नाही तरी अनेकांच्या क्रेडिट कार्डमधून व्यवहार होत आहेत.

लगेच तक्रार करा

सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झाली असेल तर लवकरा लवकर सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. त्यामुळे पैसे वाचवणे शक्य होऊ शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले.तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार करावी, असेही पोलिसांनी सांगितलं.