Deepfake चा मास्टर ब्लास्टरलाही फटका, सचिनचा ‘तो’ व्हिडीओ फिलिपिन्समधून अपलोड

| Updated on: Jan 30, 2024 | 9:19 AM

देशभरात सध्या डीपफेकच्या अनेक प्रकरणांनी धूमाकूळ घातला आहे. रश्मिका मंदानापासून ते कतरिना कैफपर्यंत अनेक सेलिब्रिटींना या खोडसाळ घटनेमुळे नाहक त्रास भोगावा लागला आहे. क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरचीही यातून सुटका झाली नाही.

Deepfake चा मास्टर ब्लास्टरलाही फटका, सचिनचा तो  व्हिडीओ फिलिपिन्समधून अपलोड
Follow us on

मुंबई | 30 जानेवारी 2024 : देशभरात सध्या डीपफेकच्या अनेक प्रकरणांनी धूमाकूळ घातला आहे. रश्मिका मंदानापासून ते कतरिना कैफपर्यंत अनेक सेलिब्रिटींना या खोडसाळ घटनेमुळे नाहक त्रास भोगावा लागला आहे. क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरचीही यातून सुटका झाली नाही. काही दिवसांपूर्वीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही याचा फटका बसला होता. एका फेक व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर एका मोबाईल गेमिंगचा प्रचार करताना दिसला होता. तसेच युजर्संना झटपट पैसा कमवण्याचा मार्ग सांगत होता. त्या व्हिडीओमुळे सचिनची झोप उडाली. त्याने लगेचच याचे स्पष्टीकरण देत हा व्हिडीओ फेक असल्याचे नमूद केले होते. अखेर आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

सचिन तेंडुलकचा तो डीपफेक व्हिडीओ किंवा त्याची चित्रफीत ही फिलिपिन्समधून अपलोड झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सचिन तेंडुलकरच्या जुनी चित्रफीतीमध्ये फेरफार करून तो ऑनलाइन गेमची जाहिरात करत असल्याचे दाखविण्यात आले होते. सचिनचे स्वीय सहाय्यक रमेश पारधे यांनी या घटनेची पश्चिम विभागीय सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सायबर पोलिसांनी ई-मेल कंपनीशी संपर्क साधला असून त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक माहिती मागितली आहे.

काय आहे प्रकरण ?

अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या डीपफेक तंत्रक्षानाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मोठा फटका बसला. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडीओ समोर आला, ज्यामुळे सगळ्यांनाचा मोठा धक्का बसला. या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर एका मोबाईल गेमिंगचा प्रचार करताना दिसला. तसेच युजर्सना झटपट पैसा कमवण्याचा मार्ग सांगत होता. फेक व्हिडीओत सचिनचा वापर करून त्याच्या तोंडून असं सांगण्यात आलं आहे की, ‘मला माहिती नव्हतं की पैसे कमवणं इतकं सोपं आहे. माझी मुलगी या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे.’

मात्र हा व्हिडीओ समोर येताच एकच खळबळ माजली, सचिनची तर झोपच उडाली. त्याने X ( पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवर तातडीने एक स्पष्टीकरणही दिलं. व्हिडीओ पोस्ट करत सचिन तेंडुलकरने स्पष्टीकरण दिलं होतं. तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात होत असलेल्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली. सचिन तेंडुलकरने लिहिलं की, “हा व्हिडीओ फेक आहे आणि फसवणुकीच्या हेतूने बनवला गेला आहे. तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे वापर चुकीचा आहे. माझी तुम्हा सर्वांना अशी विनंती आहे की जाहिरातीत असा व्हिडीओ दिसला तर रिपोर्ट करा.”

“सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे. यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीवर लवकरात लवकर कारवाई केली पाहीजे. त्यांची भूमिका याबाबतीत खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे चुकीच्या सूचना आणि बातम्यांवर रोखता येतील आणि डीपफेकचा गैरवापर संपुष्टात येईल.”, असंही सचिन तेंडुलकरने पुढे नमूद केलं.

अखेर या प्रकरणाचा आता उलगडा झाला असून सचिनचा हा व्हिडीओ फिलिपिन्समधून अपलोड झाल्याचे स्पष्ट झाले. सचिन तेंडुलकरच्या जुनी चित्रफीतीमध्ये फेरफार करून तो ऑनलाइन गेमची जाहिरात करत असल्याचे दाखविण्यात आले होते.