
सध्या तरुणाईमध्ये सोशल मिडियाचा वापर करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक तरुण आणि तरुणी हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. मात्र हे रिल बनवणं चांगलेच महागात पडू शकते. मुंबई आणि नवी मुंबईत अशाच प्रकारच्या दोन नव्या घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत मुंबईतील मालाड-कांदिवली लिंक रोडवर चालत्या कारमध्ये मुलींनी जीवघेणे स्टंट केले. तर दुसऱ्या घटनेत नवी मुंबईतील खारघरमध्ये एका तरुणीने चालत्या गाडीवर डान्स करुन कायद्याची पायमल्ली केली. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे.
मुंबईत मालाड-कांदिवली लिंक रोडवरील मीठा चौकीजवळचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तीन मुली चालत्या कारमधून बाहेर डोकावून धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीच्या दाव्यानुसार, या मुली दारूच्या नशेत होत्या. रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीतून असे जीवघेणे स्टंट करणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर इतर वाहनचालकांसाठीही धोकादायक ठरु शकते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता मुंबई पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात, तसेच तपासात काय उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक रस्त्यांवर असे बेफिकीर कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर दुसरीकडे नवी मुंबईतील खारघरमध्येही प्रसिद्धीसाठी केलेला एक स्टंट एका तरुणीला आणि तिच्या चालकाला चांगलाच भोवला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका तरुणीने भर रस्त्यात, चालत्या गाडीच्या बोनेटवर डान्स केल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ समोर येताच खारघर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या घटनेतील आरोपींना शोधून काढले.
नाझमिन सुल्डे नावाच्या या तरुणीसह गाडीच्या चालकावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्या आधारे गाडी व आरोपींची ओळख पटवली. या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत आणि भीतीदायक कृत्य केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे प्रसिद्धीसाठी बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांना एक कडक संदेश मिळाला आहे.
सार्वजनिक ठिकाणी असे स्टंट करणे हे केवळ धोकादायकच नाही, तर कायद्याने गुन्हा देखील आहे. अशा कृत्यामुळे स्वतःच्या जीवाला आणि इतरांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तरुणाईने प्रसिद्धीसाठी असे गैरप्रकार टाळावेत आणि कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.