लोखंडी बैलगाडीला बांधलं, जाळ लावून… 14 वर्षाच्या पोरासोबत भयंकर कृत्य, महाराष्ट्र हादरला!

सध्या एक गंभीर घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलावर अन्वनित अत्याचार केला आहे.

लोखंडी बैलगाडीला बांधलं, जाळ लावून... 14 वर्षाच्या पोरासोबत भयंकर कृत्य, महाराष्ट्र हादरला!
dhule crime news
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 22, 2025 | 8:02 PM

Dhule Crime News : ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याचा संशय घेऊन एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अन्वनित अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलाचे अपहरण करून त्याला लोखंडी बैलगाडीला बांधून खालून जाळ लावत चटके देण्यात आले आहेत. या घटनेनंतर आता चटक्यांनी गंभीररित्या भाजलेल्या मुलावर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जळोद रस्त्यालगतच्या भामपूर शेतीच्या शिवारात ही घटना घडली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं?

शिरपूर तालुक्यातील जळोद रस्त्यालगतच्या भामपूर शेती शिवारात एक वीटभट्टी आहे. याच विटभट्टीजवळ हा प्रकार घडला आहे. येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अगोदर अपहरण करणय्यात आले. सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हा मुलगा अचानक गायब झाला. त्याच्या कुटंबीयांनी बरीच शोधाशोध केली. परंतु समोर आलेल्या माहितीने सर्वांना मोठा धक्का बसला. पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भामपूर येथील चिंतामण उर्फ चिंतू साहेबराव कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी यांनी मुलाला जबरदस्तीने गाडीवर बसवून त्याचे अपहरण केले.
यानंतर त्याला शिरपूर-जळोद रस्त्यावरून शेतातील वीटभट्टी परिसरात नेण्यात आले. तेथे त्याला मारहाण करून एका लोखंडी बैलगाडीला बांधण्यात आले. या क्रूरतेनंतर दोन्ही संशयितांनी बैलगाडीच्या खाली जाळ केला. गाडीखाली लावण्यात आलेल्या आगीमुळे लोखंडी पत्रा तापला आणि हिमांशू गंभीररित्या भाजला. त्याने ट्रॅक्टरचे लाईट माझ्याकडे आहेत. मी आणून देतो, असे सांगत गयावया केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी त्या मुलाला सोडून दिले.

पोलिसांनी केले गंभीर गुन्हे दाखल

घरी परतल्यावर आई-वडिलांना त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर गावात खळबळ उडाली. जखमी अवस्थेतील हिमांशूला शिरपूर कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिरपूर शहर पोलिसांनी चिंतामण उर्फ चिंटू भाऊसाहेब कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी या दोघांविरुद्ध अपहरण, मारहाण आणि हिमांशू याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांसह बालसंरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.