चिमुकला भाचा सारखा रडत होता, कंटाळून मामानेच त्याला संपवलं, कुठे घडला हा संतापजनक प्रकार ?

| Updated on: Dec 07, 2023 | 10:47 AM

मामा-भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी आणि हृदयाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तो सतत रडत होता, त्याच्या रडण्याचा त्रास होता म्हणून मामाने अवघ्या 4 वर्षांच्या भाच्याची हत्या केल्याची हादरवणारी घटना धुळ्यात घडल्याचे समोर आले आहे.

चिमुकला भाचा सारखा रडत होता, कंटाळून मामानेच त्याला संपवलं, कुठे घडला हा संतापजनक प्रकार ?
Follow us on

धुळे | 7 डिसेंबर 2023 : मामा-भाच्याचं नातंच वेगळं असतं.लहानपणीच मिळालेला सख्खा मित्र म्हणजे मामा… सगळे लाड पुरवणारा, खेळणी आणून देणारा, भरपूर मस्ती करणारा मामा हा सगळ्याच भाचरांचा लाडका असतो. पण धुळ्यामध्ये याच मामा-भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी आणि हृदयाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तो सतत रडत होता, त्याच्या रडण्याचा त्रास होता म्हणून एका नराधम मामाने अवघ्या 4 वर्षांच्या भाच्याची हत्या केल्याचा गंभीर आणि तितकाच हादरवणारा प्रकार धुळ्यात घडल्याचे समोर आले आहे.

धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मात्र हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेने आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण झाली असून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नूरुल अहमद असे ( वय 22) असे आरोपीचे नाव असून चाळीसगाव रोड पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या.

निरागस चिमुकला आजोळी आला पण …

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील फिरदोस नगर येथे हा लहान मुलगा त्याच्या आईसोबत आजोळी आला होता. थोड्यावेळाने आरोपी नूरुल हा त्याच्या भाच्यासोबत खेळू लागला. मात्र काही वेळाने त्याचा भाचा मोठमोठ्याने रडू लागला, काही केल्या थांबेचना. त्याच्या रडण्यामुळे मामा नुरूला याला त्रास होऊ लागला, त्याचं डोकंही दुखायला लागलं.

त्याच संतापाच्या भरात त्याने त्याच्या अवघ्या चार वर्षांच्या भाच्याला उचललं आणि शेजारीच असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून त्याचा जीव घेतला. थोड्या वेळाने त्या मुलाची आई त्याला शोधत बाहेर आली पण मुलगा कुठेच न दिसल्याने तिने शोधाशोध सुरू केली. अखेर तिला तिचा मुलगा शेजारच्या खोलीत असलेल्या ड्रममधील पाण्यात मृतावस्थेत दिसला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

भाच्याला मारल्याची मामाने दिली कबूली

शोकाकुल आईने जोरात हंबरडा फोडला. हे कसं झालं , मुलगा ड्रमच्या पाण्यात कसा गेला याची नातेवाईकांनी चौकशी केली तेव्हा आरोपी नुरूल याने आपणच संतापाच्या भरात भाच्याला पाण्यात बुडवल्याचे सांगत क्रूर कृत्याची कबुली दिली. त्याच्या बहिणीने लगेचच चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनमध्य धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.