तुमचे शेजारी ड्रग्ज तस्कर नाही ना? डोंबिवलीत आलिशान फ्लॅटमध्ये सापडले 2 कोटींचे ड्रग्ज, पोलिसांकडून अटक

डोंबिवलीजवळील खोणी पलावा येथील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये मानपाडा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. सुमारे २ कोटी १२ लाख रुपये किमतीचे २ किलो एमडी ड्रग्ज आणि एका तरुणीसह दोघांना अटक करण्यात आली.

तुमचे शेजारी ड्रग्ज तस्कर नाही ना? डोंबिवलीत आलिशान फ्लॅटमध्ये सापडले 2 कोटींचे ड्रग्ज, पोलिसांकडून अटक
| Updated on: Jun 27, 2025 | 6:45 PM

डोंबिवलीजवळील खोणी पलावा परिसरातील एका हायप्रोफाईल सोसायटीत मानपाडा पोलिसांनी छापेमारी करत मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी सुमारे २ कोटी १२ लाख रुपये किमतीचे दोन किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे डोंबिवलीत मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानपाडा पोलिसांना खोणी पलावा येथील डाऊन टाऊन नावाच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत डाऊन टाऊन इमारतीमधील एका फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा आढळून आला.

खास ड्रग्ज साठवण्यासाठी भाड्याचा फ्लॅट

पोलिसांनी त्वरित कारवाई करत सुरुवातीला एका २१ वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले. तिच्याकडून सुमारे २ किलो म्हणजेच दोन कोटींहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.या कारवाईदरम्यान तिचे दोन साथीदार पसार झाले होते. मात्र मानपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्यांचा पाठलाग करून त्यांनाही बेड्या ठोकल्या. हे तिघेही मुंब्रा येथील रहिवासी असून त्यांनी हा फ्लॅट खास ड्रग्ज साठवण्यासाठी भाड्याने घेतला होता.

पुढील तपासासाठी तीन विशेष पथके

धक्कादायक बाब म्हणजे, हे तिघेही एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. ते मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा करून ठाणे परिसरासह आसपासच्या शहरांमध्ये आणि विशेषतः शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात त्यांची विक्री करत होते. या रॅकेटमध्ये आणखी काहीजण सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे मानपाडा पोलिसांनी पुढील तपासासाठी तीन विशेष पथके तयार केली आहेत.

नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

डोंबिवलीसारख्या हायप्रोफाईल परिसरात ड्रग्ज तस्करांचा वावर उघड झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अमली पदार्थांच्या विक्रीबाबत कोणतीही गोपनीय माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ दिलेल्या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन अमली पदार्थ विरोधी कक्ष, कल्याण आणि मानपाडा पोलीस ठाण्याने नागरिकांना केले आहे.