
प्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागवर आणखी एक संकट ओढवलं आहे. वीरेंद्र सेहवागचा लहान भाऊ विनोद सेहगावला चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे. कोर्टाने विनोद सेहवागला फरार घोषित केलं होतं. त्यानंतर त्याला चंदीगडच्या मनीमाजरा पोलिसांनी अटक केली. विनोद सेहवागला चेक बाऊन्सच्या प्रकरणात अटक झाली आहे. चेक बाऊन्स प्रकरणात तो कोर्टात हजर झाला नाही, म्हणून त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं. वीरेंद्र सेहवागचा भाऊ विनोद सेहवाग विरोधात 7 कोटीचा चेक बाऊन्स झाल्याच प्रकरण कोर्टात सुरु आहे. त्याला याच प्रकरणात कोर्टात हजर व्हायचं होतं. पण विनोद सेहवाग कोर्टात हजर झाला नाही. म्हणून त्याला फरार घोषित करण्यात आलं.
कोर्टाने फरार घोषित केल्यावर पोलिसांनी विनोद सेहवागला अटक करुन कोर्टात हजर केलं. न्यायालयात हजर केल्यानंतर विनोद सेहवागला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विनोद सेहवागच्या वकिलांनी जामीन अर्ज केला आहे. त्यावर लवकरच सुनावणी होईल.
कसा आहे सेहवागचा परिवार?
छोट्या भावाच्या अटकेमुळे वीरेंद्र सेहवाग अडचणीत आला आहे. आधीच विरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. विनोद सेहवाग हा दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा लहान भाऊ असल्याचं म्हटलं जातं. वीरेंद्र सेहवागला चार भाऊ-बहिण आहेत. दोन बहिणी त्याच्यापेक्षा मोठ्या आहेत. विनोद त्याचा लहान भाऊ आहे. सध्या तो पोलिसांच्या अटकेत आहे.
सेहवाग समोर असला की, दिग्गज गोलंदाज टेन्शनमध्ये यायचे
वीरेंद्र सेहवाग हा टीम इंडियाचा दमदार ओपनर होता. सेहवाग त्याच्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जायचा. सुरुवातीपासूनच तो प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांवर हल्ला चढवायचा. त्याला गोलंदाजी करताना भले-भले दिग्गज गोलंदाज टेन्शनमध्ये यायचे. 1999 साली त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो सलग 14 वर्ष टीम इंडियाकडून खेळला. त्याने तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताच प्रतिनिधीत्व केलय.
374 इंटरनॅशनल सामन्यात किती हजार धावा ?
पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु करणाऱ्या वीरेंद्र सेहवागने आपल्या करिअरमध्ये 17000 पेक्षा जास्त धावा केल्या. 14 वर्षाच्या आपल्या करियरमध्ये तो 104 टेस्ट, 251 वनडे आणि 19 T20 सामने खेळला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 8586 धावा केल्या. वनडेमध्ये सुद्धा त्याने जवळपास इतक्याच धावा केल्या. वनडेमध्ये सेहवागने 8273 रन्स केले. T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सेहवगाने 394 धावा केल्या.