
डॉ. प्रतीक्षा प्रकाश भुसारे-गवारे या डॉक्टर महिलेने आयुष्य संपवलं आहे. नवऱ्याच्या संशयी वृत्तीला कंटाळून तिने जीवन संपवलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यातच प्रतीक्षाने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी व्हायरल झाल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. या चिठ्ठीतून प्रतीक्षाची वेदना दिसून येत आहे. तिचा झालेला छळ या चिठ्ठीतून तिने व्यक्त केला आहे. ही चिठ्ठी व्हायरल होताच तिचा नवरा प्रीतम घाबरला. तो तीन दिवस शेतात लपला. प्रतीक्षाच्या अंत्यसंस्कारालाही गेला नाही. त्यानंतर तो मामाच्या घरी गेला. तिथून त्याचा परदेशात पळून जाण्याचा बेत होता. पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
प्रतीक्षा प्रकाश भुसारे-गवारे या 26 वर्षीय डॉक्टर महिलेने गेल्या आठवड्यात जीवन संपवलं होतं. नवऱ्याच्या संशयी स्वभावामुळे तिने स्वत:ला संपवून टाकलं होतं. जीव देण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहिली होती. या घटनेनंतर सिडको पोलिसांनी 28 ऑगस्ट रोजी तिचा डॉक्टर नवरा प्रीतम शंकर गवारे याला अटक केली आहे. प्रतीक्षाने आयुष्य संपवल्याची माहिती मिळताच प्रीतम घाबरला. पोलीस पकडतील या भीतीने तो तीन दिवस शेतात राहिला. त्यानंतर तो पडगेवामधील सुंदरनगर येथे चुलत मामाच्या घरी आला. पोलिसांनी त्याला इथूनच अटक केली आहे.
चेहऱ्यावर पश्चात्ताप नाही…
प्रीतमचे वैद्यकीय शिक्षण रशियाला झाले होते. त्यामुळे त्याच्याकडे रशियाचा व्हिसा होता. म्हणूनच त्याने रशियाला पळून जाण्याचा प्लान तयार केला होता. पण त्यापूर्वीच पडेगावात पोलीस आले आणि प्रीतम पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी अटक केल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता. उलट प्रतीक्षाच कशी चुकीची होती हे तो सांगत होता. मृत्यूनंतरही तो प्रतीक्षाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होता.
त्याचेच लग्नापूर्वी अफेयर
प्रीतम सातत्याने प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिचा मोबाईल तपासायचा. तिला येणारे फोन आणि त्यावरील मेसेजही तपासायचा. एवढेच नव्हे तर प्रीतमने तिच्या मोबाईलचा लॉकला सुद्धा स्वत:चा फिंगरप्रिंट ठेवला होता. प्रतीक्षा कामावर गेल्यावर तो तिला सतत फोन करायचा. चुकून प्रतीक्षाने फोन घेतला नाही तर तिला शिवीगाळही करायचा. इतकं करूनही तो थांबला नाही. तो सतत प्रतीक्षाला तिचा मोबाईल नंबर बदलायला सांगायचा, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. याबाबत प्रतीक्षाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. विशेष म्हणजे प्रीतमचे लग्नापूर्वी अफेयर होते, तशी कबुलीच त्याने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.