लग्नाच्या मिरवणुकीत हवेत गोळीबार, परवानाधारक रायफलसह काडतूसे जप्त

| Updated on: Mar 25, 2023 | 5:22 PM

पाटण तालुक्यातील तळमावले गावात एका लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नाच्या मिरवणुकीत एका व्यक्तीने अचानक हवेत गोळीबार केल्याने खळबळ माजली आहे.

लग्नाच्या मिरवणुकीत हवेत गोळीबार, परवानाधारक रायफलसह काडतूसे जप्त
कराडमध्ये लग्नाच्या मिरवणुकीत गोळीबार
Image Credit source: TV9
Follow us on

कराड / दिनकर थोरात : पाटण तालुक्यातील तळमावले येथे लग्नाच्या मिरवणुकीत एका व्यक्तीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत त्याच्याजवळील परवानाधारक 12 बोअरची रायफल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सदरील घटना गुरूवारी घडली असून, गेल्या पाच दिवसात फायरिंगची तिसरी घटना घडल्याने जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. जितेंद्र जगन्नाथ कोळेकर असे ताब्यात घेण्यात आलेल्या 51 वर्षीय इसमाचे नाव आहे.

लग्नाच्या मिरवणुकीत हवेत गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील तळमावले गावच्या हद्दीत काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या गेटसमोर लग्नाच्या मिरवणुकीत एका व्यक्तीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्या. यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पाटणचे डीवायएसपी विवेक लावंड यांच्यासह ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांनी घटनास्थळाला भेट दिली.

तसेच गोळ्या झाडणार्‍या जितेंद्र जगन्नाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे. कोळेकर यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी अधिक तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

गेल्या पाच दिवसात तिसऱ्यांदा गोळीबार

पाटण तालुक्यात रविवारी 19 मार्च रोजी माजी नगरसेवक मदन कदम याने केलेल्या गोळीबारात 2 ठार तर 1 गंभीर जखमी झाला. सातारा तालुक्यात एका मॉलमध्ये गुरूवारी 22 मार्च रोजी बंदुकीतून गोळी सुटून सेल्समन जखमी झाला. तर काल गुरुवारी 23 मार्च रोजी थेट लग्नाच्या मिरवणुकीत बंदुकीतून तीन फैरी झाडल्या. यामुळे सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र दिसत आहे.