उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारत दुर्घटना; स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू, एक जखमी

| Updated on: Sep 22, 2022 | 4:38 PM

या दुर्घटनेत इमारतीमधील काहीजण जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. यापैकी 5 जणांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले.

उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारत दुर्घटना; स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू, एक जखमी
उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारत दुर्घटना
Image Credit source: TV9
Follow us on

उल्हासनगर / निनाद करमरकर (प्रतिनिधी) : उल्हासनगरमध्ये आज पुन्हा एकदा एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची (Slab Collapse) दुर्घटना घडली आहे. कॅम्प 5 मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू (Death) झाला तर एक जण जखमी (Injury) झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील ओटी सेक्शन भागात मानस टॉवर नावाची पाच मजली इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब आज दुपारच्या सुमारास कोसळला आणि थेट तळमजल्यावर असलेल्या चक्कीवर येऊन कोसळला.

चौघांचा मृत्यू, एक जखमी

या दुर्घटनेत इमारतीमधील काहीजण जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. यापैकी 5 जणांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला असून एका जखमीवर उपचार सुरू असल्याची माहिती उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

महापालिकेकडून रिकामी करण्यात आली होती इमारत

सागर ओचानी, रेणू धनवानी, धोलानदास धनावनी, प्रिया धनवानी अशी या चार मृतांची नावं आहेत. मानस टॉवर ही इमारत उल्हासनगर महापालिकेकडून धोकादायक घोषित करून संपूर्णपणे रिकामी करण्यात आली होती.

काहीजण लपून छपून करत होते वास्तव्य

मात्र तरीही या इमारतीत काहीजण लपून-छपून वास्तव्य करत होते. त्यामुळे आज दुपारी ही दुर्घटना घडल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकून चार जणांचा मृत्यू झाला.

ढिगाऱ्याखाली आणखी काही जण दबल्याची शक्यता

या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. इमारतीत नेमके किती जण होते, हे निश्चित नसल्यामुळे ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त होतेय.

यामुळे उल्हासनगर महापालिकेने एनडीआरएफच्या टीमला सुद्धा पाचरण केल्याची माहिती उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.