पतपेढीतून कर्ज मिळून देतो सांगून महिलेची फसवणूक, ‘एवढ्या’ लाखाला गंडा

| Updated on: Oct 21, 2022 | 6:31 PM

कर्ज मंजुर होण्यासाठी पतपेढीत विविध प्रक्रिया पार पाडव्या लागतात. त्यासाठी काही शुल्क भरणा करावा लागतो, असे सांगून त्रिकुटाने गेल्या दोन वर्षांत अनिता यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले.

पतपेढीतून कर्ज मिळून देतो सांगून महिलेची फसवणूक, एवढ्या लाखाला गंडा
पतपेढीतून कर्ज मिळून देतो सांगून महिलेची फसवणूक
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : कर्ज मिळवून (Get loan) देतो सांगत एका महिलेला तब्बल 14 लाखांचा गंडा (14 lakh fraud) घातल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलीस ठाण्यात (Khadakpada Police Station) तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश भांजी, कुतुब रस्सीवाला, राहुल जैन आणि इतर अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. ऑक्टोबर 2020 पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता.

पीडित महिलेला पैशांची गरज होती

कल्याणमधील गांधारी भागात राहणाऱ्या अनिता प्रभाकर पुजारी असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिता पुजारी यांना कर्जाची गरज असल्याने त्या वित्तीय संस्थांमधून कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या.

कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात असतानाच महिलेची त्रिकुटाशी भेट

याच दरम्यान ऑक्टोबर 2020 मध्ये अनिता यांची दिनेश, कुतुब, राहुल या तिघांशी भेट झाली. यावेळी आम्ही तुम्हाला एका पतपेढीतून कर्ज मंजूर करुन देतो, असे या त्रिकुटाने सांगितले.

या तिघांनी आपण जेकेव्ही मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी या पतपेढीचे पदाधिकारी आहोत, असे खोटे सांगितले. या पतपेढीची ओळखपत्रे दाखविल्याने अनिता यांचा त्रिकुटाच्या बोलण्यावर विश्वास बसला.

दोन वर्षात कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली 14 लाख उकळले

अनिता यांचा विश्वास संपादन करुन त्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया त्रिकुटाने सुरू केली. कर्ज मंजुर होण्यासाठी पतपेढीत विविध प्रक्रिया पार पाडव्या लागतात. त्यासाठी काही शुल्क भरणा करावा लागतो, असे सांगून त्रिकुटाने गेल्या दोन वर्षांत अनिता यांच्याकडून 14 लाख रुपये विविध टप्प्यांनी उकळले.

कर्जाची रक्कम मागताच त्रिकुटाने उडवाउडवीची उत्तरे दिली

कर्जाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनिता यांनी त्रिकुटाकडे कर्ज रक्कम खुली करण्याची मागणी केली. मात्र त्रिकुटाने उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळकाढूपणा करण्यास सुरुवात केली. वारंवार संपर्क करुनही हे त्रिकुट योग्य उत्तरे देत नाहीत.

कर्ज कधी मिळणार की नाही ते सांगत नाहीत. त्यामुळे अनिता यांनी कर्जाच्या शुल्कासाठी भरलेली रक्कम परत करण्याची मागणी त्रिकुटाकडे सुरू केली. त्यानंतर या त्रिकुटाने अनिता यांना प्रतिसाद देणे बंद केले. त्यांनी आपले मोबाईल बंद ठेवण्यास सुरुवात केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाणे गाठले

त्रिकुटाकडून आपणास कर्ज नाहीच, शिवाय आपल्याकडून 14 लाख रुपये उकळून त्या रकमेचा अपहार केल्याची खात्री पटल्यानंतर अनिता यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.