
चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : दोन फळ विक्रेत्यांवर एका टोळक्याकडून सशस्त्र हल्ला झाल्याची घटना नाशिकच्या सातपूर परिसरात घडली. या हल्ल्याचे नक्की कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र दहशत पसवरण्याच्या हेतूने टोळक्याने हे केल्याचे कळते. या हल्ल्यात फळ विक्रेते बंधू अखिलकुमार साहू आणि संतोषकुमार साहू हे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी सातपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात नेले. आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जखमी अखिलकुमार साहू याने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री दुकान बंद करण्याच्या वेळेला अचानक एका टोळक्याने जवळ येत त्याच्या आणि भावाच्या डोक्यावर आणि तोंडावर अचानक शस्त्राने वार केले. तसेच फळाची गाडी पलटी करून साहित्याचे देखील नुकसान केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरून गेलेल्या साहू बंधूंनी आरडाओरड केली. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक धावत आले. नागरिक जमा झाल्याचे पाहून हल्लेखोर पळून गेले. या घटनेनंतर मात्र परिसरात दहशत निर्माण झाली होती. याबाबत सातपूर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
ठाण्यातील कापूरबावडी ढोकाली परिसरात दोन गटात राडा झाला. पत्ता सांगत नाही म्हणून चक्क कोयता, चाकू आणि हत्यारं घेऊन दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ठाणे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.