गुंगीचे औषध देऊन वाहनचालकांना लुटायचे, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात

वाहनचालकांना लुटणारी टोळी सक्रिय झाली होती. लुटीच्या घटना समोर येताच पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान हैराण करणारी गोष्ट उघडकीस आली.

गुंगीचे औषध देऊन वाहनचालकांना लुटायचे, असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात
गुंगीचे औषध देऊन वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद
Image Credit source: TV9
| Updated on: May 26, 2023 | 8:46 AM

चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : गुंगीचे औषध देऊन वाहनचालकांना लुटणाऱ्या एका टोळीला नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीकडून चार गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश आले आहे. नाशिकमध्ये दोन तर पालघर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एका वाहनचालकाची अशाप्रकारे लूटमार या टोळीने केल्याचं तपासात उघड झाले आहे. या टोळीकडून तीन चारचाकी वाहने, दागिने आणि मोबाईल या हस्तगत करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती उपायुक्त प्रश्नांत बच्छाव यांनी दिली.

या टोळीची प्रमुख एक महिला असून, ती ट्रॅव्हल्सची गाडी बुक करायची. त्यानंतर गाडीत बसल्यानंतर काही अंतरावर तिच्या साथीदारांना गाडीत बसवायची. वाहन चालकाला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करायची. त्यानंतर गाडीसह वाहन चालकाकडील दागिने, मोबाईल घेऊन ही टोळी पसार व्हायची.

‘असा’ उघड झाला गुन्हा

एका कारचालकाला अशाप्रकारे लुटल्याची घटना घडली होती. एका महिलेने फोन करुन सूरतला जायचे आहे सांगितले. दिंडोरी रोड येथे ती कारमध्ये बसली. काही वेळाने चालकाला देवीचा प्रसाद म्हणून पेढा खाण्यास दिला. पेढा खाताच चालकाला गुंगी आली आणि तो बेशुद्ध झाला. यानंतर आरोपींनी कार, मोबाईल, सोन्याची चैन चोरी करुन पळ काढला. म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या सहाय्याने एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी टोळीला अटक केली आहे. निलेश राजगिरे, दिनेश कबाडे, किरण वाघमारे, मनोज पाटील अशी महिलेच्या साथीदार आरोपींची नावे आहेत.

आरोपी महिलेचा पती अहमदाबाद येथील एका हत्येच्या घटनेत सहभागी होता. येथेच तिची आरोपी कबाडेसोबत ओळख झाली होती. तर आरोपी मनोज पाटील हा फिर्यादीचा नातेवाईक आहे. त्यानेच फिर्यदीचा नंबर महिलेला दिला.