Vaishnavi Hagawane: हगवणेंच्या बैलासमोर नाचल्यानंतर गौतमी पाटील आता म्हणते..
हगवणे कुटुंबीयांच्या कार्यक्रमात बैलासमोर नाचल्याचा गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर अखेर तिने मौन सोडलं आहे. लाडक्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त वैष्णवीचा दीर सुशील हगवणेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता.

पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणी आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया समोर आली आहे. हगवणे कुटुंबाने एका जनावरासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलने डान्स केला होता. हगवणे कुटुंबाच्या लाडक्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात गौतमीला चक्क त्या बैलासमोर नाचवलं होतं. वैष्णवीच्या मृत्यूनंतर गौतमीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोलिंगला सुरुवात केली. यावर आता गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे. “वैष्णवी हगवणेसोबत जे झालं ते दुर्दैवी आहे. मी तिच्या बाजूने आहे. मला कलाकार म्हणून त्या कार्यक्रमात बोलावलं होतं. आम्ही तिथं कला सादर करतो. मला त्या कार्यक्रमाचं पूर्ण मानधन मिळालं होतं. आम्हाला त्यात घेऊ नका, आम्ही फक्त तिथे कला सादर केली होती,” असं गौतमी म्हणाली.
गौतमीने वैष्णवीच्या आरोपींना कडक शिक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे. “जे झालंय ते खूप चुकीचं आहे. या घटनेतून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतंय. याप्रकरणी वैष्णवीचे वडीलसुद्धा खूप चांगलं म्हणाले. प्रेमविवाहाबद्दल त्यांनी खूप चांगलं मत मांडलंय. यातून खरंच शिकण्यासारखं आहे. ज्यांनी ही चूक केली, त्यांना कडक शिक्षा मिळाली पाहिजे,” असं ती पुढे म्हणाली. यावेळी तिने महिलावर्गाला सल्लाही दिला आहे. “ही घटना घडली म्हणून नाही तर प्रत्येकवेळी मी महिलांना सांगत असते की तुम्ही कोणालाही घाबरू नका. जे योग्य वाटतं तेच करा. तुम्ही घाबरून बसता, याला कसं सांगू, त्याला कसं सांगू, घरातल्यांना कसं सांगू.. असं करू नका. या गोष्टी तुम्ही जितक्या लपवून ठेवणार, तितकाच तुम्हाला त्रास होणार. असं काही झालं तर पटकन बोलून, पटकन त्यावर निर्णय घेऊन मोकळे व्हा,” असा सल्ला गौतमीने दिला आहे.
गौतमीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये स्टेजवर सुशील हगवणेचा फोटो होता. सुशील हा वैष्णवीचा दीर आहे. सध्या हगवणे कुटुंबातील सर्व सदस्य पोलीस कोठडीत आहेत. हगवणे कुटुंबीयांकडून हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ सुरू होता. 51 तोळे सोनं, चांदी, रोख रक्कम दिल्यानंतरही तिचा छळ कमी झाला नव्हता. लग्नाच्या अवघ्या दोन-तीन वर्षांतच वैष्णवीने जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं.
