
उत्तर प्रदेशातील निक्की पायला हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सर्वांची एकच मागणी आहे, त्या नराधमांना फाशी द्या किंवा त्यांना सुद्धा जिवंत जाळून टाका. नक्कीच्या कुटुंबाला न्यायाची अपेक्षा आहे. वडिल भिखारी सिंह म्हणाले की, “अशा लोकांच्या घरावर बुलडोझर चालवला पाहिजे. जावई आणि सासरकडच्या लोकांना फाशी झाली पाहिजे. आमची हीच मागणी आहे” निक्कीचे वडिल Tv9 भारतवर्षशी बोलले. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, निक्कीला ते वारंवार त्रास देत होते, मग तुम्ही तुला घरी का घेऊन आला नाहीत?
या प्रश्नावर निक्कीचे वडिल म्हणाले की, “आमच्याकडे समाज बसतो. आधीच तेच निर्णय घेतात, काय करायचं आणि काय नाही. मला जेव्हा समजलं की, निक्कीला त्रास दिला जातोय. त्यावेळी मी तिला घरी घेऊन आलो” “त्यावेळी तिथे पंचायत बसली. जावई विपिन भाटी आणि तिच्या कुटुंबाला बोलवण्यात आला. त्यावेळी ते बोलले की, आम्ही निक्कीला त्रास देणार नाही. त्यावर पंचायतीने ठरवलं की, निक्कीला आता सासरी पाठवा. मात्र, त्यानंतरही जावाई आणि सासूने माझ्या मुलीला भरपूर त्रास दिला” असं भिखारी सिंह म्हणाले.
‘फिरणं आणि मुली पटवणं हाच त्याचा उद्योग’
मग, तुम्ही पोलिसांची मदत का नाही घेतली? त्यावर भिखारी सिंह म्हणाले की, “आम्हाला वाटलं की, पंचायतीच्या निर्णयानंतर ते लोक निक्कीला त्रास देणार नाहीत. मला माहित असतं, तर मी मुलीला पुन्हा पाठवलं नसतं. आम्ही आमच्या मुलीला खूप लाडात वाढवलं होतं. ती आमच्यावर ओझं नव्हती. दोन्ही मुलींना आम्ही डीपीएस शाळेत शिकवलं. आम्ही लग्न सुद्धा धुमधडाक्यात लावून दिलं” “सासरकडच्यांनी जे मागितलं ते सर्व दिलं. निक्की स्वत: चांगली कमवायची. तिने ब्यूटिशियनचा कोर्स केलेला. ती महिना 1 लाख कमवायची. ते सगळे पैसे विपिन स्वत:कडेच ठेवायचा. कारण तो स्वत: काम करत नव्हता. फिरणं आणि मुली पटवणं हाच त्याचा उद्योग होता” असा आरोप सासरे भिखारी सिंह यांनी केला.
त्याच्या गर्लफ्रेंड्सशी आम्हाला काही देणं-घेणं नाही
“विपिनच्या गर्लफ्रेंड्सशी आम्हाला काही देणं-घेणं नाही. शिक्षा फक्त विपिन आणि त्याच्या कुटुंबाला झाली पाहिजे. मुलीला चांगलं शिक्षण, चांगले संस्कार हे प्रत्येक बापाच कर्तव्य असतं. आम्ही आई-वडिलांच कर्तव्य निभावलं. लग्नानंतर मुलीची जबाबदारी सासरकडच्यांची असते. सासरकडच्यांनी तिला मुलीसारखं संभाळलं पाहिजे. पण नराधमांनी हुंड्यासाठी माझ्या मुलीला मारलं” असं भिखारी सिंह यांनी सांगितलं.