Nikki Murder Case Update : निक्की महिन्याला 1 लाख कमवायची, मग सासरच्यांनी तिचं ब्युटी पार्लर का बंद केलं? वडिलांकडून धक्कादायक खुलासा
Nikki Murder Case Update : निक्की हत्याकांड प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता निक्कीचे वडिल भिखारी सिंह यांनी एक नवीन हादरवणारा खुलासा केलाय. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणात माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो ते या प्रकरणातून समोर आलय. पुण्याच्या वैष्णवी हगवणेसारखच हे प्रकरण आहे.

यूपीच्या बहुचर्चित निक्की मर्डर केसमध्ये एक नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. जो खुलासा झालाय त्यानुसार, विपिन बेरोजगार होता. तो काही कमवत नव्हता. म्हणूनच निक्कीच्या वडिलांनी तिला ब्युटी पार्लर उघडून दिलं होतं. दोघांपैकी निदान एकाने काम करावं, घरात चार पैसे येतील म्हणून निक्कीच्या वडिलांनी तिला ब्युटी पार्लर उघडून दिलेलं. निक्कीच्या वडिलांनी सांगितलं की, विपिन काही काम करत नव्हता. म्हणून मी मुलीला ब्युटी पार्लर उघडून दिलं. निक्कीची त्या ब्युटी पार्लरमधून दर महिन्याला 1 लाख रुपयापर्यंत कमाई व्हायची. ते सगळे पैसे विपिन स्वत:कडे ठेवायचा.
“विपिन तिला सांगायचा की, तू 1 लाख रुपये कमावतेस, त्यातले 50 हजार रुपये मला दे. निक्कीने सुद्धा त्याला कधी नकार दिला नाही. विपिन सगळे पैसे स्वत:कडे ठेवायचा. दारु पिऊन निक्कीला मारहाण करायचा. त्याने नंतर पार्लर सुद्धा बंद करायला लावलं” असं निक्कीचे वडिल भिखारी सिंह यांनी सांगिलं. निक्की सोबतच माझी मोठी मुलगी कंचनला सुद्धा त्या घरात मारहाण व्हायची, असं भिखारी सिंह म्हणाले. दोन्ही मुलींच त्यांनी एकाच घरात लग्न लावून दिलेलं.
सासू चप्पल, बांबू आणि दांड्याने मारायची
कंचन जेव्हा दीराला म्हणजे विपिनला विरोध करायची, तेव्हा तिचा नवरा रोहित कंचनला मारहाण करायचा. माझ्या दोन्ही मुलींना त्यांच्या घरात मारहाण व्हायची. प्रत्येकवेळी फक्त पैशाची मागणी व्हायची. आमच्या मुलींना मारहाण होऊ नये, हा विचार करुन आम्ही पैसे द्यायचो. आता आम्ही कंचनला घरी घेऊन आलोय. सोबतच दोन्ही नतावंडांना सुद्धा आणलय. अशा माणसांच्या घरी आम्ही आता कंचनला पाठवणार नाही. विपिन आणि रोहितशिवाय सासू सुद्धा दरदिवशी नवीन डिमांड करायची. चप्पल, बांबू आणि दांड्याने माझ्या दोन मुलींना मारायची असं भिखारी सिंह म्हणाले.
निक्कीच्या मुलाने काय सांगितलं?
निक्कीची बहिण कंचनने सांगितलं की, आठ दिवसांपासून हे लोक आम्हाला जास्तच त्रास देत होते. 21 ऑगस्टला विपिन आणि सासू निक्कीला मारहाण करत होते, तो व्हिडिओ मी बनवला. त्यानंतर त्यांनी Acid टाकून माझ्या बहिणीला जाळून मारलं. निक्कीला लहान मुलगा आहे. तो आईशिवाय राहू शकतं नाही. मुलाने सर्व काही आपल्या डोळ्यांसमोर पाहिलं. तो इतका निरागस मुलगा आहे, आपल्या आईला त्या क्रूर लोकांपासून वाचवू शकत नव्हता. निक्कीच्या मुलाने सांगितलं की, “बाबांनी आईला मारलं. ती बेशुद्ध झाल्यानंतर काही गोष्टी तिच्या अंगावर टाकल्या आणि लायटरने आग लावली”
