
पैसे, ही अशी गोष्ट आहे जी कोणालाही वेडं बनवू शकते. जेव्हा पैशांचा मुद्दा येतो, तेव्हा लोकांना ना मित्र दिसतो ना शत्रू, ना माणूस दिसतो ना प्राणी. पण जेव्हा पैशाच्या मोहात पडून लोक जीव घेण्यासही तयार होतात तेव्हा धक्का बसतो. खरंतर जीवन विमा म्हणजेच इन्श्युरन्स हा आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा एक मार्ग आहे. काही अनपेक्षित घडल्यास ही विमा पॉलिसी आर्थिक मदत देते. पण काही लोकं असेही आहेत, जे या विमा पॉलिसींचा गैरवापर करतात. असाच एक माणूस.. नव्हे हैवान.. तो म्हणजे हापूर येथील विशाल कुमार. त्याने प्रथम त्याच्या पत्नी, आई आणि वडिलांचा विमा काढला. नंतर, त्याने एक एक करून प्रत्येकाला मारलं आणि नंतर त्यांचे विम्याचे पैसे हडप केले. पण गुन्हा कधीच लपून रहता नाही, कधी ना कधी उघडकीस येतोच. याच न्यायाप्रमाणे, विशालचं काळं कृत्यही अखेर उघड झालंच.
खरंतर, संभल जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) अनुकृती शर्मा यांनी सर्व विमा कंपन्यांकडून संशयित पॉलिसीची माहिती मागितली होती. त्याच दरम्यान, निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी संजय कुमार यांनी एएसपीला माहिती दिली की मेरठ येथील मुकेश चंद सिंघल यांच्याकडे 64 विमा पॉलिसी आहेत. या सर्व पॉलिसी 2018 ते 2023 दरम्यान काढण्यात आल्या होत्या.
मात्र, विशालने 25 जानेवारी 2024 ते 6 फेब्रुवारी 2024 दरम्यान कर्ज काढून, टोयोटा लेजेंडर, निसान मॅग्नाइट, ब्रेझा आणि रॉयल एनफील्ड अशा चार गाड्या खरेदी केल्या. पण त्याचा मासिक पगार आहे फक्त 25 हजार रुपये. ते पाहून
मुकेशबद्दलचा आमचा संशय आणखी वाढला.” असं एएसपी अनुकृती शर्मा म्हणाल्या. तपास केला असता असं दिसून आलं की विशालच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला होता आणि त्याला त्या सर्वांच्या विम्याचे पैसे मिळाले होते.
चार लग्नं केली
अधिक चौकशीत असे दिसून आले की विशालने चार वेळा लग्न केले होते. त्याला त्याच्या पहिल्या पत्नीच्या आणि त्याच्या आईच्या विमा पॉलिसींमधून 1.5 कोटी रुपये मिळाले होते. तर वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला दोन पॉलिसींमधून 50 लाख रुपये मिळाले. त्याच्याकडे आणखी 63 पॉलिसींमधून अंदाजे 50 कोटी रुपये होते.
चौथ्या पत्नीने केला उलगडा
विशालची दुसरी आणि तिसरी पत्नी कुठे आहे, याचा शोध घेतला जात आहे. मात्र, एक वृत्तसंस्था विशालच्या चौथ्या पत्नीशी बोलली तेव्हा तिने अनेक गुपिते उघड केली. ती म्हणाली, “मी मेरठची आहे. मी फेब्रुवारी 2024 मध्ये विशालशी लग्न केले. आमच्या लग्नाच्या एक-दोन दिवसांतच मला कळले की त्याने अनेक लग्ने केली आहेत.”
त्यानंतर विशाला मला म्हणला की येत्या 5-7 दिवसांत त्याच्या वडिलांचा मृत्यू होणार आहे. पण ते ऐकून मी हैराण झाले कारण माझ्या सासऱ्यांची तब्येत तर धडधाकट होती. मी त्याबद्दल विशालला प्रश्न विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण नंतर, विशालने मला जाहीरपणे धमकी दिली की मी माझ्या सासऱ्यांना मारण्यास मदत करावी, कारण त्याने त्यांच्या नावाने 60 कोटी रुपयांची विमा पॉलिसी काढली होती. मी नकार दिल्यावर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. एवढंच नव्हे तर त्याने माझाही 3 कोटींचा विमा काढला होता, असं तिने कबूल केलं.
कशी वाचली चौथी बायको ?
ती पुढे म्हणाली, “माझ्या सासऱ्यांच्या मृत्यूनंतर, विमा कंपनीचे तपासकर्ते आमच्या घरी येऊ लागले. मग मला जाणवले की तो मलाही अशाच प्रकारे मारू शकतो. एका रात्री विशालने मला इतके मारहाण केली की मी जवळजवळ मेले असते. पण मी माझ्या वडिलांना आणि भावाला फोन केला. त्यानंतर, मी त्यांच्यासोबत माझ्या आईवडिलांच्या घरी गेलो. पण, विशालने मला अनेक वेळा परत बोलावण्याचा प्रयत्न केला, अगदी सहलीची ऑफरही दिली. पण मी त्याच्याकडे परत गेले नाहीच” असंही तिने नमूद केलं.
विशालने पोलिसांसमोर दिली कबुली
अखेर पोलिसांनी विशाल आणि त्याच्या साथीदाराला अटक केली तेव्हा त्यांनी सर्व काही उघड केले. पोलिसांनी स्पष्ट केले की विशालने यापूर्वी विमा मिळविण्यासाठी खोटा वैद्यकीय अहवाल बनवला होता, ज्यामध्ये त्याने 22 जून 2017 रोजी त्याच्या आईचा अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला होता. या आधारे, त्याला प्रभा देवीच्या विमा पॉलिसीतून 25 लाख रुपये मिळाले. पण हे खोटे होते. विशालने त्याच्या आईची डोक्यात जड वस्तूने वार करून हत्या केली होती.
80 लाखांचा विमा
विशालने पोलिसांना सांगितल की “मग मी 2022 मध्ये माझी पहिली पत्नी एकता सिंघल हिची हत्या केली. माझे एका प्रसिद्ध रुग्णालयाशी संबंध होते. मी त्यांचा वापर मला हवे असलेले कागदपत्रे तयार करण्यासाठी केला, जेणेकरून मला विम्याचे पैसे सहज मिळू शकतील. यावेळीही मी एकताच हिचा आजाराने मृत्यू झाल्याचे भासवून तिच्या विमा पॉलिसीतून 80 लाख रुपये घेतले. मी एकताचा गळा दाबून खून केला.” असं त्याने कबूल केलं.
62 पॉलिसीचे पैसे येणं बाकी
” 1 एप्रिल 2025 रोजी मी माझे वडील मुकेश सिंघल यांचीही अशाच प्रकारे हत्या केली. त्यानंतर, त्यांच्यासाठीही मी खोटा अपघाती मृत्यू अहवाल तयार केला, असं त्याने सांगितलं. मुकेशच्या नावावर एकूण 64 विमा पॉलिसी होत्या, ज्यांची एकूण किंमत 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.” यापैकी दोन पॉलिसींचे पैसे आधीच मिळाले होते. उर्वरित पॉलिसींची चौकशी सुरू होती. तेव्हाच हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी विशालचा सहकारी सतीश कुमार यालाही अटक केली आहे.