Shrinagar Attack : श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला; पोलीस उपनिरीक्षक जखमी

| Updated on: Aug 13, 2022 | 9:53 PM

दोन दिवसांपूर्वीच जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवर दोन दहशतवाद्यांनी पहाटेच्या सुमारास हल्ला केला होता. त्या हल्ल्यात भारतीय लष्करी चार जवान शहीद झाले. त्यानंतर दोन दिवसांनी हा ग्रेनेड हल्ला झाला आहे.

Shrinagar Attack : श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला; पोलीस उपनिरीक्षक जखमी
काश्मिरात पुन्हा दहशतवादी कटाचा पर्दाफाश
Follow us on

श्रीनगर : देशभरात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी डोके वर काढले आहे. केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) श्रीनगर येथील बंकर (Bunker)वर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला (Grenade Attack) केला आहे. सुरक्षा दलांना टार्गेट करण्याचे सत्र दहशतवाद्यांनी पुन्हा सुरु केल्याचे या हल्ल्यामुळे स्पष्ट झाले आहे. श्रीनगरच्या अली जान रोडजवळ हा हल्ला झाला. या हल्ल्यात एक पोलिस जखमी (Police Injured) झाला आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीआरपीएफच्या 161 व्या बटालियनचे उपनिरीक्षक परवेझ राणा असे जखमी पोलिसाचे नाव आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले असून सुरक्षा दलांनी परिसराची नाकाबंदी करून शोधमोहीम राबवली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.

दोन दिवसांपूर्वीच राजौरीत लष्कराच्या छावणीवर झाला होता हल्ला

दोन दिवसांपूर्वीच जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवर दोन दहशतवाद्यांनी पहाटेच्या सुमारास हल्ला केला होता. त्या हल्ल्यात भारतीय लष्करी चार जवान शहीद झाले. त्यानंतर दोन दिवसांनी हा ग्रेनेड हल्ला झाला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांमध्ये खळबळ उडाली असून दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधील बिजबेहारा भागात पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त नाका पार्टीवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्या गोळीबारात एक पोलिस जखमी झाला होता. त्या जखमी पोलिस कर्मचाऱ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते. या लागोपाठच्या हल्ल्यांमुळे काश्मीर खोऱ्यात पुन्हा अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. यापूर्वी जून महिन्यात दहशतवाद्यांनी स्थलांतरित मजुरांना लक्ष्य केले होते. शोपियान जिल्ह्यात परप्रांतीय कामगारांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तसेच आगलार जैनपोरा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात चार मजूर जखमी झाले होते. दुसरीकडे बडगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक स्थलांतरित कामगार ठार झाला तर अन्य एक जखमी झाला होता. याचदरम्यान श्रीनगर शहरातील लालबाजार भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस शहीद झाला तर दोन जण जखमी झाले. लाल बाजार भागातील जीडी गोयंका शाळेजवळील पोलिस नाका पार्टीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात एएसआय मुश्ताक अहमद यांचा जागीच मृत्यू झाला, तर हेड कॉन्स्टेबल अबू बकर जखमी झाले होते. दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया रोखण्याचे आव्हान सुरक्षा दलांपुढे उभे राहिले आहे.

हे सुद्धा वाचा