ज्या हातांनी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले, त्याच हातांनी केला खून…अवघ्या 17 दिवसांपूर्वी झालं होतं लग्न !

| Updated on: Jun 08, 2023 | 1:09 PM

लग्नाला अवघे 17 दिवस उलटत नाहीत तोच पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

ज्या हातांनी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले, त्याच हातांनी केला खून...अवघ्या 17 दिवसांपूर्वी झालं होतं लग्न !
नववधूची पतीने केली हत्या
Follow us on

इंदोर : ज्या हातांनी वधूला मंगळसूत्र घातलं, त्याच हातांनी पतीने नववधूची (husband killed wife) हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील धार नाका येथे राहणारे विक्रम (विकी) आणि अंजली यांचा विवाह 21 मे 2023 रोजी झाला होता. दोघांच्या लग्नाला अवघे 17 दिवस झाले होते. 7 जून रोजी विकीने अंजलीची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. ज्या हाताने विकीने अंजलीसोबत लग्नाचे फेरे घेतले, तेच हात अंजलीच्या रक्ताने रंगले होते. आरोपीच्या हातालाही दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इंदूरजवळील धारा नाका महू येथे राहणाऱ्या विकीने पत्नी अंजलीची चाकूने हत्या केली. त्याने अंजलीच्या अंगावर चाकूने 10 वार केले. गळ्यापासून शरीराच्या अनेक भागांवर चाकूने वार करण्यात आले. अंजलीच्या किंकाळ्या ऐकून विकीच्या कुटुंबीयांनी तिच्या खोलीकडे धाव घेतली. आतमध्ये आल्यावर पाहिले तर अंजली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यासोबतच विकीही जखमी अवस्थेत होता.

अंजलीचा मृत्यू तर विकीवर उपचार सुरू

दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अंजलीला मृत घोषित करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून कुटुंबीयांकडून संपूर्ण माहिती घेतली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्याचवेळी विकीला इंदूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

21 मे रोजी झाले होते

21 मे 2023 रोजी दोघांचे मोठ्या थाटामाटात लग्न झाल्याचे सांगण्यात आले. विकी पिथमपूर येथील एका कारखान्यात काम करतो. हा विवाह त्याच्या इच्छेविरुद्ध झाला असल्याचे समोर आले आहे. त्याला अंजलीशी लग्न करायचे नव्हते.

पोलिसांनी सांगितले की, पतीने आपल्या नवविवाहित पत्नीची हत्या केली आणि चाकूने स्वतःलाही जखमी केले. आरोपीवर उपचार सुरू आहेत. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.