जुन्या वादातून टोळक्याकडून तरुणाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

वडील कामावरुन आले नाही म्हणून त्यांना शोधायला मुलगा गेला. मात्र वडिलांना शोधायला गेला अन् स्वतःच जखमी होऊन आला.

जुन्या वादातून टोळक्याकडून तरुणाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
नाशिकमध्ये जुन्या वादातून तरुणाला मारहाण
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 14, 2023 | 4:40 PM

नाशिक : जुन्या वादातून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरात दुचाकीहून आलेल्या 6-7 जणांच्या टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण मारहाणीची घटना परिसरात असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे. या घटनेबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन मधुकर जाधव असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. भद्रकाली पोलीस अधिक तपास करत आहे.

जुन्या वादातून टोळक्याचा हल्ला

वेळ होऊन गेली तरी वडील कामावरुन परतले नव्हते. यामुळे चेतन हा त्याचा मित्र ऋषभ चव्हाण याच्यासोबत वडिलांचा शोध घेण्यासाठी शिंगाडा तलाव परिसरात आला होता. यावेळी शिंगाडा तलाव परिसरात चेतन आणि त्याचा मित्र हे उभे असताना पाठीमागून दुचाकीहून 6 ते 7 जण तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून चेतन जाधव याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले.

मारहाणीत चेतन जखमी

यानंतर त्याला खाली पाडत लाथा बुक्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देखील हल्लेखोरांनी दिली होती.या मारहाणीची संपूर्ण घटना परिसरात असलेल्या CCTV कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेत चेतन हा जखमी झाला आहे. या घटनेत भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित नितीन चिळवंटे, गुरु, येशू,अनिल उर्फ येडा, अनिल याचा भाऊ पांड्या आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.