नवजात बालिकेवर अघोरी विद्या ? ऐकून तुमच्या मनात येईल चीड…

पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. यवतमाळमध्ये अंधश्रद्धेतून पाच दिवसाच्या बालिकेसोबत संतापजनक घटना घडली आहे.

नवजात बालिकेवर अघोरी विद्या ? ऐकून तुमच्या मनात येईल चीड…
यवतमाळमध्ये पाच दिवसाच्या बालिकेला चटके दिल्याची घटना
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 17, 2023 | 2:47 PM

यवतमाळ : माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. एका नवजात बालिकेच्या पोटावर बिब्बाचे चटके देऊन पोटदुखीच्या त्रासावर उपाय केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अमानवीय कृत्यामुळे बालिकेची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली आहे. जखमी अवस्थेत बालिकेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर या चिमुकलीला जीवदान देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताहेत. मन हेलावणाऱ्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे पुरते धिंडवडे निघाले आहे.

बाळाचे पोट दुखत असल्याने बिब्ब्याचे चटके दिले

बाळाला पोटात दुखत होते, म्हणून आई-वडिलांनी गावातील जुन्या मंडळींचे ऐकून अंधश्रद्धेचा हा अघोरी प्रकार केला. महिलेची 6 जून रोजी घाटंजी तालुक्यातील पारवा पीएचसीमध्ये प्रसुती झाली होती. आईवडील तिला घरी घेऊन गेले. मात्र ती रडतेय म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता जेष्ठ मंडळींनी सांगितलेल्या अघोरी प्रकाराचा प्रयोग केला. पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करून त्याचे चटके दिले. यामुळे बाळाची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई नाही

यवतमाळच्या शासकीय रुग्णालयाच्या बालरोग विभागात या बाळावर उपचार सुरू असून, डॉक्टर या बाळाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून पोलीस विभागात एक कक्ष स्थापन केला जातो. मात्र अद्याप पोलिसांकडून या विषयावर कुठलीही कारवाई केली गेली नाही. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अजूनही लोक जुन्या गोष्टी ऐकून अघोरी कृत्य करतात, हे घटनेवरून दिसून येत आहे. या बालकाला चटके देणाऱ्यावर काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे आहे.