
जळगावात बबली या हिंदी चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घटना समोर घडली आहे. जळगावातील एका जोडप्याने 20 ते 21 जणांची 55 लाख 60 हजारांची फसवणूक केली आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याचं सांगून या जोडप्याने जळगावातील तब्बल 20 जणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने रेल्वेत नोकरी लाऊन देतो, म्हाडामध्ये फ्लॅट देतो, रेल्वेत टेंडरचे काम करतो अशी वेगवेगळे आमिष दाखवून 20 जणांना तब्बल 55 लाख 60 हजारांना लुबाडले आहे. हितेश रमेश संघवी व त्याची पत्नी अर्पिता संघवी अशी फसवणूक करणाऱ्या दांपत्याचे नाव आहे. आता याप्रकरणी जळगावातील शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे सोपवण्यात आला आहे
जळगाव शहरातील जुने गावातील विठ्ठल पेठेत राहणारे हर्षल शालीग्राम बारी यांच्यासह 20 जणांनी फसवणूक झाली आहे. या जोडप्याने 23 नोव्हेंबर 2024 ते 8 ऑगस्ट 2025 या आठ महिन्यात एकूण 55 लाख 60 हजार रुपये लुबाडले असल्याचे समोर आले आहे.
आरोपी जोडप्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र, बनावट लेटरपॅड आणि अपॉइंटमेंट लेटर दाखवून सर्वांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मुलांना रेल्वेत टीसीची तसेच इतर पदावर नोकरी लावून देण्याचे, टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि बऱ्याच लोकांकडून पैसे लुटले.
ज्या लोकांनी पैसे दिले होते त्यांचे कोणतही काम झाले नाही. तसेच या जोडप्याने फोनवर उडवाउडवीची उत्तरे दिली आणि कालांतराने फोन बंद केला. त्यामुळे या जोडप्याने फसवणूक केल्याचे लोकांच्या लक्षात आले, त्यानंतर नागरिकांनी पोलिस अधीक्षक यांची भेट घेत तक्रार केली. कर्ज काढून, दागिने मोडून आम्ही नोकरीसाठी पैसे दिले आहेत, मात्र या जोडप्याने फसवणूक केली आहे. त्यामुळे दोघांना लवकरात लवकर अटक करून आमचे पैसे आम्हाला परत मिळावे अशी मागणी तक्रारदार नागरिकांनी केली आहे.
दरम्यान आता हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. संघवी दांपत्याने इतरही अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता आणखी लोकांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे.