धक्कादायक, भाजपच्या माजी नगरसेवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

रात्रीच्या सुमारास वैष्णवी साडी सेंटर जवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

धक्कादायक, भाजपच्या माजी नगरसेवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
Crime_Scene
Image Credit source: TV9 Network File Photo
| Updated on: Aug 27, 2025 | 9:02 AM

जळगावच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. माझी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर धारदार कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात प्रभाकर चौधरी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.

रात्रीच्या सुमारास वैष्णवी साडी सेंटर जवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तसेच पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागांमध्ये पथके रवाना केली आहेत. हा हल्ला कुणी आणि का केला? यामागच कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलेलं नाही.

हल्ल्यामागचं कारण काय?

प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रभाकर चौधरी हे चाळीसगावमध्ये भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. या घटनेबद्दल समजल्यानंतर पोलिसांनी लगेच पावलं उचलत तातडीने तपास सुरु केलाय. पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवल्या आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी ही पथकं रवाना झाली आहेत. हा हल्ला राजकीय की व्यक्तीगत वैमनस्यातून झाला, याचा पोलीस शोध घेत आहेत.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न

प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जिल्हा भाजपाकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजी नगरसेवकावर हल्ला होण्याची पहिली वेळ नाही

जळगावात कुठल्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाहीय. फेब्रुवारी 2024 मध्ये सुद्धा भाजपच्या एका माजी नगरसेवकावर असाच प्राणघातक हल्ला झाला होता. ही घटना सुद्धा चाळीसगावात घडली होती. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबाराच सीसीटीव्ही फुटेज सुद्धा होतं. चार ते पाच अज्ञात तरुण तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी बाळू मोरे त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी सुद्धा जळगावातील चाळीसगाव या घटनेने हादरलं होतं.