जादूटोणा, पैशांचा पाऊस आणि फसवणूक.. निवृत्त शिक्षकाला लाखोंचा चुना

लाखोंचे कोटी करतो सांगत जालन्यात एका निवृत्त शिक्षकाची मोठी फसवणूक करण्यात आली. त्याला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

जादूटोणा, पैशांचा पाऊस आणि फसवणूक.. निवृत्त शिक्षकाला लाखोंचा चुना
निवृत्त शिक्षकाची लाखोंची फसवणूक
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 23, 2025 | 12:24 PM

एका लाखाचे एक कोटी करून देतो… असा दावा करत एक निवृत्त शिक्षकाला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा भयानक प्रकार जालन्यामध्ये उघडकीस आला आहे. पैशांचा पाऊस पाडतो असं सांगत भामट्याने त्या शिक्षकाकडून थोडे थोडे करत तब्बल 46 लाख रुपये उकळले आणि नंतर तो त्याला त्याला चुना लावून पसार झाला. लाखो रुपयांच्या या फसवणुकीप्रकरणी सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये आरोपी रतन लांडगे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादूटोण्याच्या माध्यमातून एक लाख रुपयांचे एक कोटी रुपयांत रूपांतर करण्याचा दावा करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली रतन लांडगे याला जालना तालुका पोलिसांनी यापूर्वीदेखील अटक केली होती. मात्र त्यानतंरही तो सुधारला नाहीच. त्याने पुन्हा एका इसमाची फसवणूक केली असून त्याचा हा गुन्हा उघडकीस आला आहे.

पैशांचा पाऊस पडतो सांगत लावला लाखोंचा चुना

‘ मी पैशांचा पाऊस पाडतो, पैसे दुप्पट करून देतो..’ असे खोटे आश्वासन देऊन रतन लांडगे आणि त्याच्या एका सहकाऱ्याने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील निवृत्त शिक्षक रामेश्वर उबाळे यांना 46 लाख रुपयांना गंडा घालत त्यांची फसवणूक केली. सर्वप्रथम रामेश्वर उबाळे जालना बसस्थानकावर एका व्यक्तीला भेटले. त्या व्यक्तीने उबाळे यांना जालना येथील रहिवासी रतन आसाराम लांडगे यांच्या घरी नेले, त्यांना त्यांचे पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवलं, तेथे रतन लांडगे यांनी प्रथम एक विधी केला आणि पैशांचा पाऊस पडत असल्याचे भासवले आणि नंतर उबाळे यांच्याकडून 46 लाख रुपये उकळले.

मात्र त्यानंतर पूजा करताना अडथळा येत असल्याचे सांगून दोघांनीही ती पूजा करणं थांबवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उबाळे यांनी त्यांचे पैसे परत मागितले, परंतु रतन लांडगे आणि त्यांच्या साथीदाराने पैसे परत केले नाहीत, उलट उडवाउडवीची उत्तर दिली. आयुष्यभराची कमाई अशी एका झटक्यात गेल्याचे आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर निवृत्त शिक्षक असलेले रामेश्वर उबाळे यांनी तातडीने सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या आरोपी रतन लांडगे हा तालुका जालना पोलिसांच्या ताब्यात आहे आणि सदर बाजार पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.