
एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चप्पलच्या पट्ट्यावरुन सुरु झालेला छोटासा वाद इतका वाढला की, दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इतक्या छोट्याशा कारणावरुन झालेल्या दोन हत्यांमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आरोपीला अटक करुन त्याची चौकशी सुरु आहे. 72 वर्षीय सरगिया बालमुचू आणि त्यांची 65 वर्षीय पत्नी मुक्ता बालमुचू या दोघांचा मृत्यू झाला. या जोडप्याचा 31 वर्षीय मुलगा चरण बालमुचूने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तपासासाठी पोलिसांची विशेष टीम बनवण्यात आली. झारखंडच्या पश्चिमी सिंहभूम येथील गुआगु गावात ही धक्कादायक घटना घडली.
पोलिसांनी सांगितलं की, सरगिया बालमुचू आणि त्यांची पत्नी मुक्ता बालमुचू यांची हत्या शेजारी राहणाऱ्या जंगम बालमुचूने केली. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. जंगमला त्याच्या चप्पलचा पट्टा तुटलेला दिसला. त्यावरुन तो संतापला. यासाठी त्याने बालमुचू जोडप्याच्या मुलींना जबाबदार धरलं. त्यावरुन दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरु झाला. हळूहळू हा वाद तीव्र होत गेला. पोलिसांनी ही माहिती दिली.
बैठकीत वाद का वाढला?
वाद सोडवण्यासाठी मागच्या रविवारी पंचायतीची बैठक बोलवण्यात आली. पण वादावर तोडगा निघण्याऐवजी अजून वाढला. बैठकी दरम्यान जंगमने पंचायतीसमोर एक बकरा आणि दारुची मागणी केली. जोडप्याने आपल्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत मागणी पूर्ण करण्यात असमर्थता दाखवली. त्यानंतर आरोपी नाराज होऊन बैठकीतून निघून गेला.
रात्री काय घडलं ते समजलं नाही
पोलिसांनुसार, आरोपीने याच रागातून रविवारी रात्री जोडप्याच्या घरी जाऊन हे हत्याकांड केलं. आरोपीने कुऱ्हाडीने दोघांचं मुंडकं उडवल्याचा प्राथमिक तपासातून समोर आलय. आसपासच्या लोकांना रात्री काय घडलं ते समजलं नाही.
ग्रामस्थ ते दृश्य पाहून हादरले
मंगळवारी सकाळी गावात मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. गावकरी घरात गेले, तेव्हा दोघे पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले होते. ग्रामस्थ ते दृश्य पाहून हादरले. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. या घटनेनंतर गावात भय आणि तणावाचं वातावरण आहे.