AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पठ्ठ्या बायकोला सोडायला माहेरी गेला, बसमध्ये दीड लाखांचा मोबाईल गायब, तरुणाने जे केले, ते पाहून पोलिसही चक्रावले

पठ्ठ्या बायकोला सोडायला माहेरी गेला, बसमध्ये दीड लाखांचा मोबाईल गायब, तरुणाने जे केले, ते पाहून पोलिसही चक्रावले

| Updated on: Oct 14, 2025 | 10:27 AM
Share

कल्याणमध्ये बसमध्ये ₹1.5 लाखांचा मोबाईल चोरीला गेल्याने संतप्त तरुणाने रस्त्यातच बस थांबवून प्रवाशांची झडती घेतली. यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत तरुणाला शांत केले.

आधीच वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या कल्याणकरांना आज कल्याण पश्चिम येथील बैल बाजार परिसरात एका अजब आणि धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. एका तरुणाचा महागडा मोबाईल बसमध्ये चोरीला गेला. त्यानंतर त्याने थेट रस्त्याच्या मध्येच बस थांबवून प्रवाशांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली. या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला. तसेच वाहतूक कोंडी वाढल्याने अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

नेमकं प्रकरण काय?

संतोष साळवे असे मोबाईल चोरीला गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संतोष आपल्या पत्नीला माहेरी सोडण्यासाठी जात होते. त्यांनी आपल्या पत्नीसह कल्याण पश्चिम येथील बैल बाजार परिसरातून बस पकडली. मात्र काही वेळातच त्यांच्या खिशातला तब्बल दीड लाख रुपये किमतीचा महागडा मोबाईल गायब झाल्याचे त्याच्या लक्षात आले. मोबाईल चोरीला गेल्याचे समजताच संतोष साळवेने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने कोणतीही तमा न बाळगता रस्त्याच्या मधोमध बस थांबवली. यानंतर त्याने प्रत्येक प्रवाशाची बॅग आणि खिसे तपासण्यास सुरुवात केली.

यावेळी बसमध्ये प्रवासी खच्चून भरले होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. कोणताही वाद नये म्हणून अनेक प्रवासी एक एक करून आपली बॅग आणि खिसे तपासणीसाठी देत होते. खाली उतरत होते. या अजब प्रकारामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

पोलिसांना मोठा मनस्ताप

या सर्व गोंधळामुळे कल्याण रोडवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या वाहतूक कोंडीची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने संतोष साळवे याला थांबवले. “तू मोबाईल शोधतोय. मोबाईल मिळाला का? लोकांना हैराण करतोय. तुझी काय तक्रार असेल तर पोलिस ठाण्यात कर. आम्ही शोध घेऊ.” असे पोलिसांनी संतोष याला सांगितले.

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि समजुतीनंतर संतोष साळवे याने तपासणी थांबवली. यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र, संतोष साळवे याच्या या कृत्यामुळे बसमधील प्रवासी, बस चालक, वाहक आणि वाहतूक पोलिसांना मोठा मनस्ताप झाला. एकीकडे संतोष साळवेच्या मोबाईल चोरीची घटना चर्चेत असताना दुसरीकडे कल्याण पश्चिम येथील खडकपाडा पोलिसांनी केलेल्या एका उत्तम कामगिरी केली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत चोरीला गेलेले सुमारे साडे तीन लाखाहून अधिक किमतीचे २५ मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकांना परत केले आहेत.

Published on: Oct 14, 2025 09:58 AM