
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 12 डिसेंबर 2023 : अवघ्या 10-12 दिवसांपूर्वी झालेल्या आई-मुलाच्या दुहेरी हत्याकांडामुळे कल्याण हादरलेलं असतानाच शनिवारी स्टेशनजवळच्या एका लॉजमध्ये महिलेचा मृतेदह सापडल्याने पुन्हा खळबळ माजली. मात्र महात्मा फुले पोलिसांनी सापळा रचून अवघ्या 24 तासांच्या आतच या हत्याकांडामागील आरोपीला बेड्या ठोकल्या.
कौटुंबिक वादातून पतीनेच त्याच्या पत्नीला लॉजवर बोलावून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आरोपी भूपेंद्र गिरी याला पोलिसांनी उस्मानाबादमधून अटक केली. कौटुंबिक वादाचा हा शेवट अतिशय हिंसक आणि धक्कादायक झाल्याने शहरात एकच खळबळ माजली.
आधी लॉजवर बोलावले आणि..
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजमधील एका रूममध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. ज्योती तोरडमल असे त्या मृत महिलेचे नाव होते. ती घाटकोपर येथे रहात होती. शनिवारी दुपारच्या सुमारास ज्योती ही भूपेंद्र गिरी या इसमासोबत स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजवर आली होती. मात्र रविवारी सकाळी बराच वेळ उलटूनही त्यांच्या रूमचा दरवाजा कोणीच उघडतं नव्हतं. त्यामुळे लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या किल्लीने दरवाजा उघडला तेव्हा त्यांना रूममध्ये ज्योतीचा मृतदेह आढळल्याने ते हादरलेच. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ महात्मा फुले पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना दिली. पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला.
सोबत नांदण्यास नकार दिल्याने केली हत्या
तृप्ती लॉजमध्ये ज्योती तोरडमल हिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु करत विविध टीम आरोपीच्या शोधात दोन पथक तयार करत आरोपीचा शोध सुरू केला होता. याच दरम्यान तांत्रिक बाबीसह सूत्रांच्या दिलेल्या माहितीनंतर कल्याण महात्मा फुले पोलिसांनी 24 तासाच्या आत सापळा रचत आरोपी भुपेंद्र गिरीला उस्मानाबाद मधून बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुपेंद्र हा मृत महिला ज्योतीचा पती असून त्या दोघात गेल्या पाट वर्षांपासून घरगुती वाद होता. त्यामुळे ते दोघे वेगवेगळे राहायचे. याचदरम्यान तिने घरी यावं यासाठी भूपेंद्रने वारंवार तगादा लावला होता, मात्र रोजचा वाद पाहून ज्योती हिने घरी येण्यास ठाम नकार दिला. अखेर संतापलेल्या भूपेंद्रने शनिवारी तिला तृप्ती हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. लॉजच्या रुममध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाल आणि त्याने संतापाच्या भरात तिची हत्या केली आणि सामान आणण्याच्या बहाण्याने पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत बेड्या ठोकल्या आणि तपासत सर्व माहिती उघड झाली.